मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांची कसरत; पाषाण, सुतारवाडी, सुस, म्हाळुंगेसाठी शटल बस सुरू करा! नगरसेविका मयुरी कोकाटे यांची PMPML प्रशासनाकडे मागणी

पुणे : छत्रपती शिवाजीनगर ते मान-हिंजवडी मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांना मेट्रो सेवेचा लाभ मिळू लागला आहे. मात्र, मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक सार्वजनिक बससेवेचा अभाव असल्याने प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी पाषाण, सुतारवाडी, सुसगाव आणि म्हाळुंगे येथून मेट्रो स्टेशनपर्यंत शटल बस सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी नगरसेविका मयुरी कोकाटे यांनी PMPML प्रशासनाकडे केली आहे.

यासंदर्भात नगरसेविका मयुरीताई राहुल कोकाटे यांनी PMPML चे संचालक अजय खेडेकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. सध्या या परिसरातून मेट्रो स्टेशनपर्यंत पुरेशी सार्वजनिक बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी, नोकरदार, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रिक्षा किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत असून मेट्रो सेवेचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले.

यामध्ये पाषाण गाव ते मेट्रो स्टेशन, सुतारवाडी ते मेट्रो स्टेशन, सुसगाव ते मेट्रो स्टेशन आणि म्हाळुंगे ते मेट्रो स्टेशन असे चार शटल बस मार्ग सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी मयुरी कोकाटे म्हणाल्या, “मेट्रो सेवा सुरू झाली असली तरी नागरिकांना मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी बस उपलब्ध होणे आवश्यक आहे. शटल बस सेवा सुरू झाल्यास नागरिकांना वेळेवर, सोयीचा आणि परवडणारा प्रवास करता येईल. तसेच मेट्रो प्रवाशांची संख्या वाढण्यास मदत होऊन खासगी वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडीही कमी होईल.”

त्यामुळे PMPML प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन शटल बस आणि आवश्यक PMPML बस सेवा सुरू करावी, अशी मागणी नगरसेविका मयुरी कोकाटे यांनी केली आहे.

See also  ससून रुग्णालय नक्की कोणासाठी?असा विचारत आप ने सामान्य माणसाला मारहाणीचा व्यक्त केला निषेध