गणेशोत्सवापूर्वी पुण्यातील प्रमुख मिरवणूक मार्ग खड्डेमुक्त करण्याच्या सूचना, पोलीस आयुक्त व पुणे मनपा आयुक्त यांच्या संयुक्त पाहणी

पुणे : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिक व भाविकांना सुरक्षित आणि सुरळीत सुविधा मिळाव्यात यासाठी कसबा व विश्रामबाग वॉर्ड कार्यालयाच्या हद्दीतील प्रमुख गणेशोत्सव मिरवणूक मार्गांची संयुक्त पाहणी करण्यात आली. आमदार हेमंत रासणे, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत ही पाहणी झाली.

या पाहणीदरम्यान प्रमुख मिरवणूक मार्गांवरील रस्त्यांची अवस्था, खड्डे, पाणीपुरवठा, ड्रेनेज, विद्युत व्यवस्था, पदपथ, अतिक्रमणे आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला. गणेशोत्सवापूर्वी आढळलेल्या त्रुटी दूर करून आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.

कसबा गणपती मंदिर येथून पाहणीस सुरुवात करून शिवाजी रोड, भाऊ रंगारी गणपती, तांबडी जोगेश्वरी, केळकर रोड, पासोड्या विठोबा मंदिर, सोन्या मारुती मंदिर, सोमेश्वर मंदिर, रांका ज्वेलर्स, महाराणा प्रताप रस्ता, कस्तुरी चौक, जैन मंदिर, नाईक हॉस्पिटल, फडगे पोलिस चौकी, सेवा मित्र मंडळ, मंडई गणपती, दगडूशेठ देखावा, गुरूजी तालीम, लक्ष्मी रस्ता, पुरम चौक आदी महत्त्वाच्या परिसरांची पाहणी करण्यात आली.

महावितरणच्या केबल खोदाईनंतर अपूर्ण राहिलेली रस्ते दुरुस्ती, काँक्रीट व डांबरी रस्त्यांवरील खड्डे, अपूर्ण समतलीकरण तसेच अरुंद रस्ते व पदपथांवर पादचाऱ्यांना अडथळा ठरणारे विद्युत डीपी बॉक्स यांचीही पाहणी करण्यात आली.काही ठिकाणी ड्रेनेज लाईनमधील गळती आणि तुंबलेल्या वाहिन्यांची समस्या निदर्शनास आली. या समस्या तातडीने दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. संबंधित क्षेत्रीय कार्यालयांनी खड्डे व खराब रस्त्यांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी, तर पथ विभागाने प्रत्यक्ष देखरेख ठेवून कामांचा दर्जा सुनिश्चित करावा, असे निर्देश देण्यात आले.

कसबा, मंडई आणि स्वारगेट मेट्रो स्टेशन परिसरात गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असल्याने या भागातील रस्ते खड्डेमुक्त आणि सुस्थितीत ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला.गणेशोत्सव संपेपर्यंत पाणीपुरवठा, ड्रेनेज, महावितरण आणि अन्य युटिलिटी विभागांनी नवीन रस्ते खोदाई टाळावी, तसेच यापूर्वी करण्यात आलेल्या खोदाईची कामे पूर्ण करून रस्ते समतल करावेत, अशा सूचना देण्यात आल्या. ड्रेनेज विभागाने मुख्य वाहिन्यांची पाहणी करून गळती व तुंबलेल्या वाहिन्या दुरुस्त कराव्यात. महावितरण व विद्युत विभागाने उघड्या तारा सुरक्षित कराव्यात आणि पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या डीपी बॉक्सबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही निर्देश देण्यात आले.

See also  पुणे जिल्ह्यात आयुष्मान भव: अभियानांतर्गत आरोग्य मेळाव्याचे आयोजन

गणेशोत्सव काळात पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिक व भाविकांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने समन्वयाने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

या पाहणीवेळी महापालिकेचे मुख्य अभियंता (पथ विभाग) राजेश बनकर, मुख्य अभियंता (विद्युत विभाग) मनीषा शेकटकर, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे, पथ विभागाचे अधीक्षक अभियंता रोहिदास गव्हाणे, सहाय्यक महापालिका आयुक्त मुल्ला, सहाय्यक महापालिका आयुक्त राजेश गुर्रम यांच्यासह महावितरणचे अधिकारी आणि महापालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.