पुणे, दि. ९ : केंद्र शासनाच्या विविध योजना व प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा आढावा घेताना प्रलंबित कामांसाठी स्पष्ट उद्दिष्ट आणि कालमर्यादा निश्चित करून ती तातडीने पूर्ण करावीत, तसेच चांदणी चौक घोटवडे फाटा पिरंगुट हिंजवडी मेट्रोचा डीपीआर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक झाली. यावेळी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा तसेच मागील बैठकीतील निर्देशांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या. बैठकीस पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे, विधान परिषद सदस्य डॉ.नीलम गोऱ्हे, आमदार भीमराव तापकीर, बापूसाहेब पठारे, शंकर मांडेकर, बाबाजी काळे, हेमंत रासने, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रस्तावांना गती देताना वनाज-चांदणी चौक उन्नत मार्गासाठी पुणे महापालिकेची आर्थिक सहमती, रामवाडी-वाघोली मार्गिकेच्या आराखड्याला आवश्यक मान्यता आणि लोहगाव विमानतळ मेट्रो जोडणीचा सविस्तर प्रकल्प अहवाल निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी दिले. तसेच चांदणी चौक, घोटवडे फाटा पिरंगुट हिंजवडी मेट्रोचा डीपीआर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देशही दिले. खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्याला अनुमोदन दिले हा मार्ग आवश्यक असल्याचे सांगितले. विमानतळा कडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरणाचे लवकरात लवकर पूर्ण करा. यावेळी त्यांनी पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या वाढल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले.
प्रधानमंत्री आवास योजना घरांचे प्रस्ताव कालबद्ध करा
प्रधानमंत्री आवास योजना शहरी २.० अंतर्गत पुणे महापालिकेकडे प्राप्त अर्जांची छाननी झाली असून ३,२२७ अर्ज पात्र ठरले आहेत. मामुर्डी, पुनावळे, वडमुखवाडी, ताथवडे व चोविसावाडी येथील सुमारे ६,८०० घरांशी संबंधित भूसंपादन व हस्तांतरणाची प्रक्रिया कालबद्ध करा तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या पहिल्या टप्प्यात ९१.५९ टक्के पूर्ण झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यात ३८,४६५ पैकी ९,२५८ घरे पूर्ण, तर २९,२०७ घरे प्रगतीपथावर आहेत. प्रत्येक तालुक्याला मासिक उद्दिष्ट निश्चित करून कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
भारतनेट अंतर्गत पुणे बिझनेस एरियात १,४९० कार्यरत जोडण्या आणि १,३६६ ग्राहक जोडण्या कार्यान्वित आहेत. जिल्ह्यातील सुमारे १,४०० ग्रामपंचायतींना जोडण्यासाठी वर्षनिहाय व तालुकानिहाय कालबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामपंचायत स्तरावर भारतनेट उद्योजक नोंदणी वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबवा, असेही ते म्हणाले.
स्वामित्व योजनेत १,१०० गावांची ड्रोन मोजणी पूर्ण झाली असून ८२९ गावांतील १,१३,११५ मिळकत पत्रिका तयार झाल्या आहेत. मोजणी झालेल्या व पत्रिका तयार झालेल्या गावांमध्ये उर्वरित सनद व मिळकत पत्रिकांचे वितरण तीन महिन्यांत पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
जलजीवन मिशनअंतर्गत १,२३९ योजना हाती घेण्यात आली आहेत. अद्याप ३९,२५५ नळजोडण्या शिल्लक आहेत. उर्वरित नळजोडण्या आणि अपूर्ण पाणीपुरवठा योजना मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश राज्यमंत्री मोहोळ यांनी दिले. प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेत पुणे महापालिकेने निर्धारित उद्दिष्टाच्या तुलनेत १८५ टक्के अर्ज नोंदणी आणि १०८ टक्के कर्जवितरण केले आहे. पिंपरी-चिंचवडमधील प्रलंबित अर्ज एका महिन्यात निकाली काढण्याचे निर्देश त्यांनी दिले.
दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झालेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडलेल्या विविध विषयांवरही चर्चा करण्यात आली. स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत उंड्री व फुरसुंगी भागातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत त्यांनी बैठकीत सूचना केल्या. याबाबत पुणे महानगरपालिका व आवश्यक त्या यंत्रणासोबत समन्ययातून हा विषय मार्गी लावण्याच्या दृष्टीने बैठक घेण्याच्या सूचनाही राज्यमंत्री मोहोळ यांनी दिल्या.पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची सद्यस्थिती तसेच प्रगतीबाबत माहिती दिली.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची माहिती दिली. महत्त्वाकांक्षी पुरंदर विमानतळासाठी आतापर्यंत सुमारे ७० टक्के भूसंपादन पूर्ण झाले असून उर्वरित भूसंपादनाची कार्यवाहीही गतीने पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील इतर विविध योजनांच्या प्रगतीबाबतही त्यांनी सविस्तर माहिती सादर केली.
यावेळी इंद्रायणी नदी प्रदूषण नियंत्रण, पवना नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्प, भारतीय विमानतळ प्राधिकरण, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे विभागातील सुरू असलेले प्रकल्प, सूक्ष्म कृषी सिंचन योजना, पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, भूजल सर्वेक्षण, जलशक्ती अभियान, यासह केंद्र पुरस्कृत विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
















