किष्किंधानगरमधील 36 एकर जमिनीवरून वाद; पोलिस बंदोबस्तावर जमीनमालकाचा आक्षेप

पुणे : कोथरूडमधील किष्किंधानगर परिसरातील सुमारे 36 एकर वडिलोपार्जित जमिनीवरून वाद निर्माण झाला असून, या जागेवर दर्शन चोरडिया आणि समीर मुलानी हे ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप जमीनमालक सारिका लोणारी यांनी केला आहे. या जमिनीची कथित अनधिकृत मोजणी करण्यासाठी कोथरूड पोलिसांकडून बंदोबस्त पुरवण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

या प्रकरणावरून लोणारी यांनी कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घाडगे यांच्याकडे आक्षेप नोंदवत जाब विचारला.

लोणारी यांच्या म्हणण्यानुसार, किष्किंधानगर येथील संबंधित सुमारे 36 एकर जागा ही त्यांच्या कुटुंबाची वडिलोपार्जित मालमत्ता आहे. जमिनीच्या मालकीशी संबंधित आवश्यक कागदपत्रे यापूर्वीच पोलिसांकडे सादर करण्यात आली असल्याचा त्यांचा दावा आहे. असे असताना संबंधित जमिनीची मोजणी करण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त देण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.मोजणीला विरोध करणाऱ्या आपल्या दीराला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचाही आरोप लोणारी यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मोजणीला विरोध करणाऱ्या आपल्या दीराला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचाही आरोप लोणारी यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

“आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत. तरीही आमच्यासोबत असा प्रकार झाला. पोलिसांवर कुणाचा तरी दबाव असल्याचा संशय आहे,” असा दावा सारिका लोणारी यांनी केला.

दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घाडगे यांनी संबंधित कागदपत्रांचा अभ्यास करून प्रकरणाची वस्तुस्थिती तपासण्यात येईल आणि त्यानुसार योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याचे लोणारी यांनी सांगितले.

या जमिनीच्या मालकीचा व मोजणीचा नेमका वाद काय आहे, तसेच पोलिसांनी कोणत्या कारणास्तव बंदोबस्त उपलब्ध करून दिला, याबाबत पोलिसांकडून अधिकृत भूमिका स्पष्ट झाल्यानंतर या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर येणार आहे.

See also  पुणे महानगरपालिकेच्या आवारात "इंटरनॅशनल डे ऑफ ब्ल्यू स्काय" निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन