पुणे : गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणारे भाविक, पोलिस बांधव तसेच महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी जनकल्याण फाऊंडेशनच्या वतीने अलका टॉकीज येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रथमोपचार केंद्राचे उद्घाटन पुणे पोलीस आयुक्त मा. श्री. अमितेशकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे पोलीस व पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रथमोपचार केंद्रामध्ये श्रीमती कौसल्या कराड ग्रामीण रुग्णालय व ससून हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाच्या सहकार्याने नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच युवा अस्मिता फाऊंडेशन, इनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनम यांच्यासह विविध सामाजिक संस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान भाविक, पोलिस बांधव व नागरिकांना या केंद्राचा लाभ झाला. किरकोळ दुखापत, चक्कर येणे, फ्रॅक्चर, श्वास घेण्यास त्रास होणे आदी तक्रारींवर तातडीने प्रथमोपचार व आवश्यक वैद्यकीय सेवा देण्यात आली.
यावेळी संस्थेचे विश्वस्त सुरेश सकपाळ यांनी सांगितले की, “जनकल्याण फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते. तसेच पुणे शहरातील विविध झोपडपट्टी भागांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे आणि विविध आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. समाजातील गरजू नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.”
या उपक्रमाच्या नियोजनासाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष जाधव यांच्यासह अमर जेधे, सुरेश सकपाळ, राज नाईक, सूरज वाघमारे, तुळजा भास्कर, सुधीर तावरे, हेमंत मोरे, संध्या माळी, प्रज्ञा कांबळे, डॉ. बालाजी गुगळे, डॉ. उदय झेंडे, जोशी हॉस्पिटलच्या डॉ. काजल नागरगोजे, डॉ. निवेदिता खैरे, डॉ. अमोल गौतम, सिस्टर सारिका मरळ, नामदेव केंद्रे, आकाश हुलावळे, डब्ल्यूएचओचे तेजा भास्कर आदींनी विशेष परिश्रम घेतले.
















