पदवीधर, शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी भाजपची तयारी; देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक

पुणे, बावधन : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद मतदारसंघांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बावधन येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला पुणे व पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे नगरसेवक तसेच पश्चिम महाराष्ट्रातील आमदार उपस्थित होते. बैठकीत निवडणुकीची तयारी, मतदार संपर्क आणि प्रचाराचे नियोजन यावर चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बूथनिहाय नियोजन, पदवीधर व शिक्षक मतदारांशी थेट संवाद आणि संघटनात्मक समन्वयावर भर दिला. प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मितादेवी योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शिक्षण, कौशल्यविकास, रोजगारनिर्मिती आणि शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात झालेली कामे मतदारांपर्यंत पोहोचवण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक प्रभागातून निवडणुकीसाठी योगदान देत दोन्ही मतदारसंघांत भाजप-महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, दोन्ही उमेदवार तसेच पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

See also  पुण्यातील आरपीआयच्या एक गट महायुतीच्या उमेदवारांना मतदान करणार नाही डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्या समोर एकत्र येत घेतली शपथ