महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणारे ‘ऑलिंपिक भवन’; मुरलीधर मोहोळ यांच्याकडून बांधकामाची पाहणी

पुणे : महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल परिसरात भव्य ‘ऑलिंपिक भवन’ उभारण्यात येत आहे. महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी या भवनाच्या बांधकामाची पाहणी करून कामाचा सविस्तर आढावा घेतला.

या भवनात राज्याच्या क्रीडा विभागाचे आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे मुख्यालय असणार आहे. राज्यातील सर्व अधिकृत क्रीडा संघटनांना एकाच छताखाली कार्यालयीन सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या प्रकल्पातून साकार होणार आहे. विशेष म्हणजे, देशातील पहिले ऑलिंपिक संग्रहालयही या भवनात उभारण्यात येणार असून, ऑलिंपिक चळवळीचा इतिहास, क्रीडा परंपरा आणि खेळाडूंच्या कामगिरीचे दर्शन घडविणारे केंद्र म्हणून ते विकसित होणार आहे.

भवनाचे बांधकाम दर्जेदार आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार पूर्ण करावे, विविध क्रीडा संघटनांच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना मोहोळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

महाराष्ट्रातील क्रीडा संघटनांचे बळकटीकरण, क्रीडा संस्कृतीचे संवर्धन आणि नव्या पिढीला ऑलिंपिक चळवळीची प्रेरणा देण्यासाठी हे ऑलिंपिक भवन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भविष्यात राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील प्रशासकीय, संघटनात्मक आणि प्रेरणादायी केंद्र म्हणून या भवनाची ओळख निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यावेळी क्रीडा आयुक्त दीपक सिंगला, सहसंचालक संजय सबनीस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अनिल पवार, अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीस्कर, कार्यकारी अभियंता प्रशांत खैरमोडे, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव संजय शेट्ये, वास्तुविशारद सुनील पाटील, प्रकल्प कंत्राटदार आदित्य तावरे यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

See also  अनुसया यशवंत नांदेडकर यांचे निधन