श्री.संत गाडगे महाराज इंग्रजी माध्यम शाळेत हिरव्या रंगाच्या साड्या परिधान करून नवरात्रोत्सव साजरा

कोंढवा : श्री संत गाडगे महाराज इंग्रजी माध्यम शाळा, कोंढवा येथे नवरात्रोत्सवानिमित्त शिक्षकांनी हिरव्या रंगाच्या साड्या परिधान करून उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला. या उपक्रमातून निसर्गाशी नाते, प्रगती, समृद्धी, स्त्रीशक्ती आणि सौभाग्याचा संदेश देण्यात आला.

नवरात्रोत्सवानिमित्त शाळेत विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि पारंपरिक भोंडला यांचा समावेश होता. तसेच विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

शाळेच्या सकाळ व दुपार अशा दोन्ही सत्रांमध्ये मिळून सुमारे १,२०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. नवरात्रोत्सवाचे नियोजन आणि आयोजन यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक राहुल जाधव यांनी मार्गदर्शन केले.

हिरव्या रंगाच्या साड्या परिधान करून शिक्षकांनी निसर्ग, सुख, शांती, समृद्धी आणि स्त्रीशक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच देवीची उपासना करून सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी आणि संरक्षणासाठी प्रार्थना करण्यात आली. पारंपरिक संस्कृतीचे जतन आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांची रुजवणूक करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उत्साहात पार पडला.

श्री संत गाडगे महाराज इंग्रजी माध्यम शाळा, कोंढवा येथे हिरव्या रंगाच्या साड्या परिधान करून नवरात्रोत्सव साजरा करताना शिक्षकवृंद डावीकडून : रेश्मा जावीर, विजया धोत्रे, स्वप्नाली चव्हाण, नूतन कोकरे, नजमा पठाण, उषा रेंगडे, स्वप्नाली कुंभार आणि प्रतिभा काळे.

See also  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याचे उद्घाटन