कोथरूड येथील ‘शासन आपल्या दारी’ मेळाव्यात १ हजार ३८१ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

पुणे : शासन आपल्या दारी’ उपक्रमामुळे नागरिकांना विविध योजना आणि सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळत असल्याने त्यांचा त्रास कमी होऊन त्यांच्या मनात समाधानाची भावना आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

कोथरूड येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार किरण सुरवसे, गटविकास अधिकारी भूषण जोशी, किरण दगडे पाटील, अपर्णा वरपे, पुनीत जोशी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचून अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रम, रोजगाराची माहिती मेळाव्याच्या माध्यमातून देण्यात येत आहे. अशा शिबिरांमुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचतो, त्यांना होणारा त्रास कमी होतो. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधान आहे. तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे कामकाज पारदर्शक आणि गतिमान झाले आहे. शासनाने जनहिताचे अनेक महत्वाचे निर्णय घेतल्याने सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळाला आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात श्री.आसवले यांनी मेळाव्याविषयी माहिती दिली. महाराष्ट्र शासनाचा हा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून एकाच छताखाली शासनाच्या सर्व सेवा व योजनांचा लाभ देण्यात येत आहे. आतापर्यंत हवेली उपविभागांतर्गत ७३ हजार दाखले वितरित करण्यात आले आहे. येत्या काळात हवेली तालुका ई-चावडी योजनेअंतर्गत आणण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात विविध सेवा आणि लाभाचे वितरण करण्यात आले.
१ हजार ३८१ लाभांचे वितरण:
मेळाव्यात एकात्मिक बालविकास प्रकल्प (नागरी) यांच्याकडील १५, कृषि विभाग- १८, ग्रामविकास- २१, अन्न धान्य वितरण (रेशनिंग)- ३००, संजय गांधी निराधार योजना, राज्य परिवहन मंडळ, पुणे मनपा समाजकल्याण विभाग यांचे प्रत्येकी ३४, पंचायत समिती- २०, पुणे मनपा आरोग्य विभाग-२३, महिला व बालकल्याण- ४३, मतदार नोंदणी अधिकारी- ३५, महावितरण- ७, पुणे मनपा- १० याप्रमाणेच उत्पन्न दाखले- ५५२, अधिवास प्रमाणपत्र-८० आणि आधारकार्ड- १८५ अशा एकूण १ हजार ३८१ विविध सेवा आणि योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले.

See also  दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी उपाययोजना करा-दिपक केसरकर