८० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा आनंदवन हास्य परिवाराकडून बाणेर येथे गौरव

पुणे : पिंपरी-चिंचवड येथील कुणाल मार्केट इमारतीच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत प्रसंगावधान राखत सुमारे ८० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या २१ वर्षीय आर्या विजय कांबळे हिचा बाणेर येथील आनंदवन हास्य परिवाराच्या वतीने गौरव करण्यात आला. रविवार, दि. १ नोव्हेंबर रोजी मुरकुटे गार्डन येथे झालेल्या कार्यक्रमात आर्याला शाल, गौरव प्रमाणपत्र आणि तिच्या पुढील करिअरसाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

कुणाल मार्केट इमारतीच्या पार्किंगमध्ये रात्री दीडच्या सुमारास आग लागली. या आगीत जवळपास २१ वाहने जळून खाक झाली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आणि इमारतीतील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. अशा कठीण प्रसंगी आर्या कांबळे हिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धाडस दाखवले. आई-वडिलांचा विरोध असतानाही तिने पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारून नागरिकांना सावध केले. आरडाओरडा करून मदतीसाठी हाक दिली, अग्निशमन दलाला फोन केला आणि इमारतीतील नागरिकांना सुरक्षिततेसाठी गच्चीवर जाण्याचे आवाहन केले. तिच्या प्रसंगावधानामुळे सुमारे ८० नागरिकांचे प्राण वाचल्याचे सांगण्यात आले.

आर्याच्या या धाडसाची दखल घेत आनंदवन हास्य परिवाराचे मार्गदर्शक आणि पुणे पोलीस दलाचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कदम यांनी तिचा गौरव करण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रमात अजय कदम यांनी त्या रात्री घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली.

यावेळी प्रा. मेजर रवींद्र रणखांबे, डॉ. नंदिनी रणखांबे, प्रा. रमेश गोरंटीवार, सुखदेव पवार, विद्या गोरंटीवार, विद्या खेडेकर, दिलीप बोरकर, अनघा देशपांडे, अरुणा कोगेकर यांच्यासह आनंदवन हास्य परिवाराचे सदस्य उपस्थित होते. सर्वांनी आर्याचे कौतुक करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आर्याला महाराष्ट्र शासनाच्या वतीने शौर्यपदक देऊन सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी आनंदवन हास्य परिवाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन अजय कदम यांनी दिले.

आर्याचे वडील विजय कांबळे हे दिशा सोशल फाउंडेशन, पिंपरी-चिंचवडच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतात. त्यांच्या सामाजिक संस्कारांचे प्रतिबिंब आर्याच्या धाडसी कृतीतून दिसून आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

See also  मुळशीचे चित्र बदलण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार - ना. चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही, मुठा खोऱ्यातील मुलींच्या शिक्षणासाठी बसचे लोकार्पण