पीआयसीटीमध्ये आंतरमहाविद्यालयीन क्रीडास्पर्धांचा जल्लोषात प्रारंभ

पुणे: पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (PICT) येथे 2024-25 च्या आंतरमहाविद्यालयीन क्रीडास्पर्धांचे उद्घाटन बास्केटबॉल कोर्टवर उत्साहात पार पडले. या सोहळ्यात संस्थेचे संचालक डॉ. पी. टी. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. संजय गंधे, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक श्री. सचिन एस. शिंदे, अधिकारी श्री. अंकुश सपकाळ, शिक्षकवर्ग, विद्यार्थी, तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या स्पर्धांचे आयोजन शारीरिक आरोग्य वाढवणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे या उद्देशाने करण्यात आले आहे. क्रीडा संचालक श्री. सचिन एस. शिंदे आणि अधिकारी श्री. अंकुश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी होत आहे.


श्री. अंकुश सपकाळ यांनी सांगितले की, या स्पर्धा सुमारे महिनाभर चालणार आहेत. 1 ते 10 जानेवारी 2025 या कालावधीत महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी व्हॉलीबॉल, बुद्धिबळ, टेबल टेनिस, कॅरम, आणि थ्रो बॉल या क्रीडाप्रकारांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर, 11 ते 25 जानेवारी 2025 या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडाप्रकारांचे सामने होणार आहेत.
डॉ. पी. टी. कुलकर्णी यांनी आरोग्यासाठी खेळांचे महत्त्व पटवून देत, सर्व कर्मचाऱ्यांनी खेळांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. त्यांनी यासाठी क्रीडास्पर्धा केवळ स्पर्धात्मक नव्हे तर आरोग्यदायी वातावरण निर्माण करणाऱ्या असतात, असे मत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. संजय गंधे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच खेळांचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचा घटक असल्याचे अधोरेखित केले.
PICT च्या या क्रीडास्पर्धा विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला चालना देण्यासोबतच स्पर्धात्मक भावना, संघभावना, आणि नेतृत्वगुण वाढवण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. संस्थेच्या परिसरात या स्पर्धांमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, आणि सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लक्षणीय आहे.
या स्पर्धांमुळे PICT मध्ये खेळांच्या माध्यमातून आरोग्यदायी संस्कृती वाढीस लागण्यास मदत होत आहे.

See also  वैयक्तिक शेततळ्यासाठी राज्यात ४ हजारावर शेतकऱ्यांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू