परिहार चौकात अनधिकृत खोदकाम; केबल टाकणाऱ्या कंपनीवर कारवाईची मागणी

पुणे : परिहार चौकातून एम्सच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस मध्यवर्ती मोटार परिवहन कार्यशाळेसमोर अनधिकृतपणे पादचारी मार्गाचे खोदकाम करून केबल टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित कंपनीवर कारवाई करून दंड वसूल करण्याची मागणी अरविंद पाटील यांनी केली आहे.

परिहार चौकाजवळील मुख्य रस्त्यालगत हे खोदकाम करण्यात आले असून, त्यासाठी पुणे महानगरपालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कामामुळे सुस्थितीत असलेला पादचारी मार्ग खोदण्यात आला असून, रस्त्याचेही नुकसान झाले आहे. खोदकामामुळे ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत.

विशेष म्हणजे, केबल टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही खोदण्यात आलेला पादचारी मार्ग पूर्ववत दुरुस्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून, अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे.

महापालिकेची परवानगी न घेता सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या संबंधित कंपनीची चौकशी करावी, खोदकामाचा खर्च व दंड कंपनीकडून वसूल करावा तसेच पादचारी मार्ग आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून घ्यावी, अशी मागणी अरविंद पाटील यांनी केली आहे.

See also  महाराष्ट्रात विरोधी पक्ष म्हणून उरली फक्त काँग्रेसच