प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ घेत विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाचा संदेश

पुणे, धानोरी : सिद्धार्थ शिक्षण संस्था संचालित मातोश्री गिरीजाबाई पाटील प्राथमिक मराठी शाळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय, भैरव नगर, धानोरी, पुणे – १५ येथे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘प्रदूषणमुक्त दिवाळी’ शपथ व जनजागृती संदेश उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना फटाक्यांमुळे होणारे वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण तसेच पर्यावरण व मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यांची माहिती देण्यात आली. दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा आणि उत्साहाचा सण असून तो पर्यावरणाला हानी न पोहोचवता साजरा करावा, असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. फटाके न फोडता दिवे लावून, पर्यावरणपूरक सजावट करून, गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलवून दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच पालक, मित्रपरिवार आणि समाजातील नागरिकांमध्येही प्रदूषणमुक्त दिवाळीचा संदेश पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले.

माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. विद्या पाटील व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय श्रीवास्तव यांचे मार्गदर्शन लाभले.निर्मिती – तृप्ती कांबळे व सविता इमडे, फलकलेखन – सविता इमडे व अर्चना बनछोड, शपथ वाचन – विजय श्रीवास्तव व योगेश बिंदगे, नियोजन – रिया वाघ व सुखदा वाळंज यांनी केले आणि सर्व व्यवस्थापन शारदा पाटोळे यांनी पाहिले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, सामाजिक जबाबदारी आणि प्रदूषणमुक्त सण साजरे करण्याबाबत जागरूकता निर्माण झाली.

‘फटाकेमुक्त दिवाळी, पर्यावरणपूरक दिवाळी; चला, निसर्ग जपूया आणि आनंदाची दिवाळी साजरी करूया!’ या संदेशाने उपक्रमाची सांगता झाली.

See also  आपला इतिहास मांडताना तारतम्य बाळगण्या बरोबरच इतर धर्मांचा तौलनीक अभ्यास हवा असे मत स्वामी रामानंद विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ पंडित विद्यासागर