निवडणूक आचारसंहिता भंगाच्या ३५ तक्रारींवर कार्यवाही पूर्ण

पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा संपर्क केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्राकडे तसेच सी- व्हिजील पोर्टलवर प्राप्त ४६ तक्रारीपैकी योग्य असलेल्या ३५ तक्रारींवर कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्यात आली  असून ११ तक्रारीवर कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षातर्फे देण्यात आली आहे.

जिल्ह्यात २१ विधानसभा मतदारसंघात १३५ भरारी पथके व १२९ स्थिर पथके नियुक्त केली आहेत. या पथकामार्फत सी-व्हीजील पोर्टलवर प्राप्त तक्रारीवर कार्यवाही करण्यात येत आहे. १६ मार्चपासून पर्वती विधानसभा मतदार संघात १८, कसबा -६, पुणे कॅन्टोन्मेंट आणि मावळ ४, कोथरूड आणि चिंचवड-३, पुरंदर, वडगाव शेरी, बारामती, खडकवासला आणि पिंपरी प्रत्येकी १, तर चुकीच्या तक्रारी ३ अशा एकूण ४६ तक्रारी सी-व्हीजील पोर्टलवर दाखल झाल्या. त्यापैकी ३५ तक्रारी योग्य आढळल्याने त्यावर त्वरित कारवाई  करण्यात आली. उर्वरित ११  तक्रारी संदर्भात  कार्यवाही सूरू आहे.

प्राप्त झालेल्या तक्रारी ह्या विनापरवानगी लावण्यात आलेले बॅनर व पोस्टर बाबत आहेत. नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करावयाच्या असल्यास सी- व्हिजिल पोर्टल, १८००२३३०१०२ आणि १९५० टोल फ्री क्रमांकावर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. या कक्षाद्वारे तातडीने तक्रारींची दखल घेण्यात येईल. हा कक्ष २४ तास सुरू राहणार असून त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाला आलेल्या तक्रारीनुसार भरारी पथके आवश्यक कारवाई करतील, अशी माहिती नियंत्रण कक्षातर्फे देण्यात आली आहे.

See also  जिल्ह्यात मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू