राऊतवाडीतील SRA प्रकल्पावरून रहिवाशांचा संताप; बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी! ‘रहिवाशांना विश्वासात न घेता पुनर्वसन कसे?’; प्रकल्पाला कायदेशीर विरोध करण्याचा रहिवाशांचा इशारा

कोथरूड : राऊतवाडी येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पावरून रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, प्रकल्पाची अंमलबजावणी नेमकी कोणाच्या संमतीने आणि कोणत्या प्रक्रियेनुसार सुरू आहे, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. संबंधित बिल्डरला परिसरातील अनेक रहिवाशांनी आजपर्यंत पाहिलेलेही नाही. मग रहिवाशांना विश्वासात न घेता SRA प्रकल्प कसा राबविला जात आहे, असा प्रश्न शिवमंदिराचे शिवभक्त संतोष चव्हाण यांनी बैठकीत उपस्थित केला. त्यांच्या प्रश्नाला उपस्थित रहिवाशांनी दुजोरा दिला.

रहिवाशांची संमती नसताना प्रकल्प पुढे रेटला जात असेल, तर तो कायदेशीर मार्गाने रोखण्यात येईल, असा ठाम इशारा राऊतवाडीतील नागरिकांनी दिला. बिल्डरवर अद्याप गुन्हा का दाखल करण्यात आलेला नाही, असा सवाल महिलांनीही उपस्थित केला. मरगळे मावशी आणि पायगुडे मावशी यांनी २०१० मध्ये कुमार बिल्डर यांना पाहिल्याचे सांगत, तब्बल १६ वर्षांनंतर सध्या हाच बिल्डर प्रकल्प राबवत आहे का, याबाबत शंका व्यक्त केली.

राऊतवाडी बचाव समितीचे सदस्य मंगेश सांगळे यांनी SRA प्रशासन आणि संबंधित बिल्डर यांच्यात काही लागेबांधे आहेत का, तसेच रहिवाशांची संमती नसताना याच बिल्डरला प्रोत्साहन का दिले जात आहे, असा सवाल उपस्थित केला. बिल्डरकडून होणाऱ्या दिरंगाईची सखोल चौकशी व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून, त्यानंतर पौड फाटा येथील उड्डाणपुलाजवळ लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय बैठकीत व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, गेल्या ३० वर्षे ११ महिन्यांपासून रखडलेल्या या प्रकल्पातील कथित अनागोंदीची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते राहुल वांजळे आणि उमेश मिसाळ यांनी बैठकीत मांडली. सचिन यादव आणि भूषण शिर्के यांनी प्रकल्पातील अॅमेनिटी स्पेस आणि विविध त्रुटींबाबत माहिती दिली.

प्रथमेश ढोक आणि नयना सोनार यांनी संबंधित बिल्डरकडून होत असलेल्या कथित जोरजबरदस्तीविरोधात ५ ऑक्टोबर रोजी SRA चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. मात्र, अद्याप उत्तर मिळाले नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे प्रशासन बिल्डरला पाठीशी घालत आहे का, असा संशय रहिवाशांनी व्यक्त केला.

See also  डॉ. दिलीप भाऊ मुरकुटे पाटील मित्र परिवार युवा मंच आयोजित सरंजाम वाटप कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या बैठकीला राऊतवाडीतील बहुसंख्य रहिवासी उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनीही आपली मते मांडली. रहिवाशांच्या संमतीने आणि विश्वासानेच पुनर्वसन प्रक्रिया राबवावी, अन्यथा संबंधित बांधकाम व्यावसायिकाविरोधात कायदेशीर लढा उभारण्यात येईल, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.