पुणे : २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि निरपराध नागरिक तसेच सीमेवर देशरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांना आणि दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटातील मृत नागरिकांना पोलिस मित्र संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
बालगंधर्व चौक येथे ‘जरा याद करो कुर्बानी’ या उपक्रमांतर्गत श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि नागरिकांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून शहीद वीरांना आदरांजली वाहिली. पोलीस निरीक्षक रंजीत सिंह परदेशी यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब अंतरकर, भाग्यश्री कुंभार, पोलीस निरीक्षक रणजितसिंह पाटील, पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, विजय चौधरी, चंद्रशेखर कपोते, सुभाष जेधे, मनीष सोनिग्रा, चैतन्य जगताप, सुमेधा मुठे, गणेश जाधव, अपूर्व खाडे यांच्यासह पोलिस मित्र संघटनेचे पदाधिकारी, सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशाच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीदांच्या स्मृतींना उजाळा देत उपस्थितांनी त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
















