औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाची अतिक्रमणांवर धडक कारवाई; ३०,२०० चौ. फूट जागा मोकळी; खडकी व बोपोडी परिसरात ७३ शेड, ९ स्टॉल आणि ७३ बांधकामे निष्कासित

पुणे : औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि फ्रंट मार्जिनमध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणांवर पुणे महानगरपालिकेने मंगळवारी (दि. २५ नोव्हेंबर) धडक कारवाई केली. या मोहिमेत एकूण ३० हजार २०० चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत कच्चे व पक्के बांधकाम निष्कासित करण्यात आले.

औंध रस्ता, खडकी तसेच भाऊ पाटील रस्ता, बोपोडी परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. रस्ते व पदपथांवर अनधिकृत व्यावसायिक स्टॉल, काउंटर, शेड आणि विविध प्रकारचे साहित्य उभारण्यात आल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते. पादचाऱ्यांनाही पदपथावरून चालताना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे सार्वजनिक रस्ते आणि पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेने ही कारवाई केली.
उपायुक्त सोमनाथ बनकर (अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग), उपायुक्त अविनाश सपकाळ (परिमंडळ क्र. २) तसेच सहायक आयुक्त इंद्रायणी करचे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

कारवाईदरम्यान ७३ शेड, ९ अनधिकृत स्टॉल आणि ७३ कच्चे-पक्के बांधकामे निष्कासित करण्यात आली. दुकानांबाहेर लावण्यात आलेले अनधिकृत बोर्ड, बॅनर व जाहिरात साहित्यही हटविण्यात आले. जप्त केलेले साहित्य महापालिकेच्या औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील गोडाऊनमध्ये जमा करण्यात आले. या मोहिमेसाठी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी, ५ मनपा पोलीस, १७ एमएसएफ जवान, ३७ बिगारी सेवक, ४ जेसीबी, २ गॅस कटर आणि २ ओपन ट्रक तैनात करण्यात आले होते. बांधकाम विकास विभाग, झोन क्र. ६ यांच्यामार्फत फ्रंट मार्जिनमधील अनधिकृत बांधकामांवरही निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

See also  जी-२० प्रतिनिधींनी घेतले पालखीचे दर्शन