इंद्रायणीकाठी गीताभक्ति अमृत महोत्सवासाठी संतांची मांदियाळी!

आळंदी : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष, राष्ट्रसंत पूज्य स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज यांच्या ७५ व्या जन्मसोहळ्या निमित्ताने आळंदीनगरी सज्ज झाली आहे. आज सकाळी मलुक पीठ, वृंदावनचे संत राजेंद्रदास महाराज यांचे उपस्थितीत धार्मिक अनुष्ठान करण्यात आले. यावेळी देशभरातील साधुसंतांच्या उपस्थितीने इंद्रायणीकाठी संतांचा मेळा भरल्याचीच अनुभूती मिळत होती. जवळपास पंधरा हजारांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत आज सकाळी ज्ञानेश्वर माऊलींना अभिषेक व त्यानंतर झालेल्या वारकरी सन्मान सोहळ्याने शुभारंभ झालेला गीताभक्ति अमृत महोत्सव ११ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.

आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण धर्मरक्षा आणि राष्ट्र निर्माणासाठी समर्पित करणारे पूज्य स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज स्वामी विवेकानंदांसारख्या संत परंपरेचे प्रचारक आहेत. दरवर्षी पूज्य स्वामीजींचा जन्मदिवस गीताभक्ति दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र यावर्षी स्वामीजींच्या दिव्य जीवनाची 75 वर्ष पूर्ण होत असल्याने संलग्न संस्थांनी ‘गीताभक्ति अमृत महोत्सवा’चे आयोजन केले आहे. आज (ता.४) सकाळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊलींना अभिषेक व त्यानंतर वारकरी सत्कार, यज्ञ विधीचा शुभारंभ व कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तपोमूर्ती कल्याणदासजी महाराज, ह.भ.प.संदीपन महाराज शिंदे व ह.भ.प.भास्करगिरिजी महाराज यांची किर्तने संपन्न झाली.

आज पासून इंद्रायणी काठी सुरु झालेल्या गीताभक्ती अमृत महोत्सवासाठी 70 हजार चौरस फुटांचा भव्य मांडव उभारण्यात आला आहे. मंचावरील कार्यक्रम प्रत्येक भाविकाला व्यवस्थित पाहता यावेत यासाठी विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे. अध्यात्म, संस्कृती आणि उत्सव यांचा अनोखा भक्तीपूर्ण संगम आळंदीत झाला असून या सोहळ्यासाठी पुढील आठ दिवस देशभरातील साधुसंतांसह दिग्गज राजकीय नेते व मान्यवर हजेरी लावणार आहेत.

वाढदिवस हे केवळ निमित्त आहे, या निमित्ताने ज्ञानोबा-तुकारामांच्या विचार देशभरात पोहोचेल. विश्व कल्याणाचा व समन्वयाचा, शांती आणि प्रेमाचा संदेश आपल्या सर्व संतानी दिला. महाराष्ट्राचे संत शिरोमणी ज्ञानदेवांच्या भूमित हा कार्यक्रम होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

गीता परिवार, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान, श्रीकृष्ण सेवानिधी व संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल या संस्थानी गीताभक्ति अमृतमहोत्सव सोहळ्याचे आयोजन करुन भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अनोखा मेळ घातल्याचेही स्वामीजींनी यावेळी सांगितले. आजच्या कार्यक्रमाला वारकरी संप्रदायासह पूज्य स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज यांना मानणारे हजारो भाविक उपस्थित होते.

See also  रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता मेळावा