पुणे : सकल मराठा समाज पुणे शहराच्या वतीने श्री खंडूजी बाबा मंदिर डेक्कन येथे झालेल्या बैठकीमध्ये आगामी पुणे लोकसभा निवडणूक रिंगणामध्ये मराठा समाजाचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला.
अंतरवाली सराटी येथे झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीमध्ये समाजाच्या वतीने भाजपा विरोध करण्यासाठी एकच उमेदवार देण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला होता या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. इतर कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्यापेक्षा मराठा समाजाचा उमेदवार रिंगणात उतरवण्यात यावा अशी भावना यावेळी सर्व समाज बांधवांनी व्यक्त केली.
यावेळी पुणे शहर व शहरालगतच्या 60 हून अधिक गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उमेदवार कोण असावा याबाबत पुढील बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येणार असून इच्छुकांची नावे मनोज जरांगे पाटील यांना कळवण्यात येणार आहेत. यावेळी मातंग समाजाच्या काही जणांनी मराठा समाज जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले.
राजकीय पक्षांच्या पदांचा राजीनामा देऊन समाविष्ट होणाऱ्या बांधवांना आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी देण्यात यावी तसेच पक्षापेक्षा समाजाला महत्त्व देणाऱ्या व्यक्तीचा प्राधान्याने विचार करावा अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. विधानसभा मतदार संघा नुसार मराठा समाजाच्या बैठका घेऊन बांधणी करण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांनी आपल्या परिसरामध्ये मराठा समाजाच्या बैठका घेऊन काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या नियोजना संदर्भामध्ये शहराची विशेष कार्यकारणी पुढील बैठकीत तयार करण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाने कोणत्याही राजकीय पक्षाच्या सभांना अथवा बैठकांना जाऊ नये तसेच मराठा समाजासाठी काम करावे असे आवाहन करण्यात आले.