घारापुरी मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचा बोटीतून प्रवास

पुणे : घारापुरी…समुद्रातलं असं ऐतिहासिक ठिकाण की जेथे पर्यटक एलेफंटा गुंफा पाहण्यासाठी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावरुन बोटीने प्रवास करुन पोहोचतात. पण आज मतदान कर्मचाऱ्यांचा समुद्र प्रवास झाला तो लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पाडण्यासाठी..!

मावळ लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवार १३ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून विधानसभा मतदारसंघनिहाय निश्चित केलेल्या ठिकाणाहून आज सकाळी ८ वाजेपासून मतदान साहित्य वितरण प्रक्रियेला सुरूवात झाली. मतदानासाठी आवश्यक असणारे बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र मतदान पथकनिहाय ताब्यात देण्यात आले. तसेच  मतदान प्रक्रीया पार पाडण्यासाठी आवश्यक साहित्य, विविध अहवालाच्या प्रती आणि मार्गदर्शक सूचना साहित्य यावेळी पथकाकडे सुपूर्द करण्यात आले. या पथकांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी वाहतूक व्यवस्थाही करण्यात आली होती.

या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात उरण विधानसभा मतदार संघ येतो. उरण मतदारसंघातील मतदान केंद्रांसाठी मतदान साहित्याचे वितरण जसई येथील डी.बी पाटील मंगल कार्यालयातून करण्यात आले. यामधील ५८ क्रमांकाचे घारापुरी मतदान केंद्र आहे. अरबी समुद्रातील बेटावरील हे मतदान केंद्र असून तेथे ३८९ पुरूष आणि ४२० महिला असे एकूण ८०९ मतदार वास्तव्य करतात.

या मतदान केंद्रासाठी स्वतंत्र क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. १ मतदान केंद्राध्यक्ष, २ मतदान अधिकारी, १ मतदान सहाय्यक  यांनी आज उरण मधून मतदानाचे साहित्य ताब्यात घेतले. सोबत पोलीस बंदोबस्त घेऊन मतदान कर्मचाऱ्यांचे हे पथक आधी जीपने जेएनपीटी बंदरापर्यंत आले आणि तेथून थेट बोटीने मतदान साहित्य घेऊन घारापुरीतल्या या मतदान केंद्रावर पोहोचले.

लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मतदार महत्वाचा असल्याने उरण विधानसभा मतदारसंघातील घारापुरी  मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी बोटीचा वापर करून मतदान पथकाने समुद्र मार्गाने  प्रवास केला. मतदान कर्मचाऱ्यांनी प्रवासाचे हे अंतर पूर्ण करून मतदान केंद्रावर साहित्य पोहोचविले. उरण विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार या सर्व घडामोडीवर लक्ष ठेऊन होते.

देशाच्या प्रत्येक पात्र मतदाराला लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी होता यावे यासाठी या कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे. जिल्ह्यासह राज्याच्या इतरही भागात मतदान कर्मचारी अशा विविध परिस्थितीत कर्तव्य बजावत असून  नागरिकांना या उत्सवात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

See also  रेकॉर्ड ब्रेक गर्दी... तरुणाईचा जल्लोषअमोल बालवडकर फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात अवघे कोथरूडकर न्हाऊन निघाले !