श्रीमंत उदयन महाराज प्रतापसिंह भोसले यांच्या संरजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना तहहयात सुरु ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे राज्याच्या इतिहासातील अनन्य साधारण महत्त्व विचारात घेऊन व श्रीमंत भोसले कुटुंबियांची उपजिविका यांच्या दर्जानुसार व्हावी यासाठी या घराण्याच्या खासगी जमिनी व इतर मालमत्ता यांना द बॉम्बे सरंजाम्स, जहागिर्स अँड अदर इनाम्स ऑफ पॉलिटीकल नेचर, रिझम्शन रुल्स १९५२ मधून त्या त्या आदेशात नमूद अटीं व शर्तींवर सूट देण्यात आली आहे. ही सूट श्रीमंत उदयन महाराज प्रतापसिंह भोसले यांच्या हयातीनंतर वंश परंपरेने त्यांच्या लिनियल वारसांना चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिकेच्या निर्णयास अधिन राहून असेल.