पाषाण : पुणे महानगरपालिका निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०९ (ड) मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार मयूर भगवान सुतार यांनी आज औंध–बाणेर क्षेत्रीय कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज विधिवत दाखल केला.
पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी आणि सुस परिसरातून ९ (ड) गटासाठी मनसेचा एकमेव अधिकृत उमेदवार म्हणून मयूर सुतार हे सध्या निवडणूक रिंगणात उतरले असून, त्यांच्या उमेदवारीमुळे परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
विशेष म्हणजे सुतारवाडी परिसरातून खुल्या प्रवर्गामध्ये प्रथमच उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने सुतारवाडी व परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या उत्साहाचा थेट फायदा मयूर सुतार यांना होईल, असा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
पाषाण–सुतारवाडी परिसरात स्कूल बस व्यवसायामुळे परिचित असलेले मयूर सुतार हे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि स्थानिक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला असून, त्यामुळे त्यांचा जनसंपर्क मजबूत झाला आहे.
स्थानिक पातळीवरील ओळख, सामाजिक कार्याची पार्श्वभूमी आणि मनसेच्या अधिकृत उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक ०९ (ड) मध्ये मयूर सुतार यांची उमेदवारी आश्वासक मानली जात आहे. आगामी निवडणुकीत ते कितपत प्रभाव टाकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
























