अयोध्येतील राम मंदिराप्रमाणे गीत रामायणावर सर्वांची श्रद्धा! – नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे गौरवोद्गार

पुणे : ७० वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर आजही गीतरामायणाची गोडी सर्वांना असून, अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या राम मंदिरावर सर्वांची श्रद्धा आहे. तशीच श्रद्धा गदिमा लिखित आणि सुधीरबाबू फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतरामायणावर आहे, असे गौरवोद्गार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले. कोथरूडचा लोकप्रतिनिधी पदाच्या कार्यकाळात गदिमा स्मारकाच्या कामाला मूर्त रूप मिळाले, असेही ते यावेळी म्हणाले.

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आधुनिक वाल्मिकी, महाकवी ग‌. दि. माडगूळकर यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त कोथरुड मध्ये समग्र गदिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गदिमांचे नातू सुमित्र माडगुळकर, गायक हृषिकेश रानडे, दत्तप्रसाद जोग, बाबूजींना साथ देणारे पंडित रमाकांत परांजपे, संयोजिका ॲड.‌ वर्षाताई डहाळे, विनीत गाडगीळ, सुनील देवभानकर यांच्या सह कोथरुडकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, आधुनिक वाल्मिकी महाकवी गदिमा माडगूळकर लिखित आणि संगीतकार सुधीर फडके (बाबूजी) यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतरामायणाची ७० वर्षांनंतर आजही सर्वांना गोडी आहे. अयोध्येतील श्रीरामांच्या मंदिरावर सर्व देशवासियांची श्रद्धा आहे. तशीच श्रद्धा गदिमा लिखित आणि सुधीरबाबूंनी संगीतबद्ध केलेल्या गीतरामायणावर श्रद्धा आहे.

ते पुढे म्हणाले की, पुणे सारख्या सांस्कृतिक शहरात गदिमांचे स्मारक व्हावे ही सर्वांचीच इच्छा होती. अनेकांनी यासाठी प्रयत्न करुनही ते पूर्णत्वास येऊ शकले नाही. कोथरूडचा लोकप्रतिनिधी पदाच्या कार्यकाळात हे स्मारक मूर्त स्वरूपात साकार होत आहे, याचा विशेष आनंद आहे, अशी भावना ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

गदिमांचे नातू सुमित्र माडगुळकर म्हणाले की, गदिमांनी आपल्या ५८ वर्षाच्या आयु:काळात या काळात त्यांनी १५७ मराठी चित्रपट, २५ हिंदी चित्रपट, दोन हजारांपेक्षा जास्त गाणी आणि स्वातंत्र्यसैनिक म्हणून काम यासोबतच १२ वर्षे ते आमदार होते. तरीही गदिमांच्या स्मारकासाठी आम्हाला ४० वर्षे झगडावं लागलं. मात्र, २०१९ मध्ये मुक्ताताई टिळक, मुरलीधर मोहोळ, माधुरी सहस्रबुद्धे आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या काळात स्मारकाचे काम कोथरूड मध्ये गतीने सुरू आहे, याचा आनंद होतो आहे. त्यामुळे कोथरुड मतदारसंघाचा आम्हा सर्वांना हेवा वाटतो, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, आधुनिक काळातील वाल्मिकी, महाकवी गदिमांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त गदिमांची अजरामर काव्यरचना गीतरामायणाचा दत्तप्रसाद जोग यांनी शब्दबद्ध केलेला हिंदी भावानुवादाचा पहिला प्रयोग कोथरुड मध्ये झाला. या प्रयोगाला कोथरूडकरांनी या उदंड प्रतिसाद देत, कलाकारांनी सादर केलेल्या गितांना भरभरुन दाद दिली.

See also  अनाथ मुलांसाठी गृह प्रकल्पांमध्ये प्राधान्य हवे – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे