पुणे मनपातील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपमध्ये खदखद; उत्तर कोथरूड-बाणेर बालेवाडी मधील निष्ठावंत काहिसे नाराज

पुणे : पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांच्या निवडीवरून भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. महापालिकेतील १० स्वीकृत नगरसेवक पदांपैकी ७ जागा सत्ताधारी भाजपच्या वाट्याला आल्या असून या जागांवर पक्षाने पराभूत उमेदवारांना संधी न देता निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य दिल्याचा दावा केला जात आहे. मात्र या सातही जागांपैकी बहुतेक संधी पुणे लोकसभा मतदारसंघातील पाच विधानसभा मतदारसंघां पुरत्याच मर्यादित राहिल्याने काही भागातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

भाजपने ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत गोपनीय पद्धतीने राबविल्याची चर्चा असून सात जणांनी अर्ज दाखल केल्यानंतरच ही नावे समोर आली. सात नावांवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता पक्षातील अंतर्गत राजकारणावर उघडपणे चर्चा सुरू झाली आहे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे खासदार Murlidhar Mohol यांच्या वतीने दोन नावे सुचविण्यात आली होती. कोथरूडमधील काही विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारताना स्वीकृत सदस्यत्वासाठी विचार केला जाईल, असा शब्द दिल्याची चर्चा होती. मात्र खासदार मोहोळ यांचे निकटवर्तीय मानले जाणारे निलेश कोंढाळकर यांनाही स्वीकृत नगरसेवकपदाची संधी देण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीत त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती; मात्र आमदार आणि खासदारांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी न देण्याचा पक्षाचा निर्णय झाल्याने त्यांना तेव्हा संधी मिळाली नव्हती.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोथरूड मतदारसंघाला स्वीकृत नगरसेवकपद देण्यात आले असले तरी सुमारे दीड लाख मतदार असलेल्या कोथरूड मतदारसंघातील बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, पंचवटी, सोमेश्वरवाडी आणि विधाते वस्ती परिसरातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी न मिळाल्याची चर्चा आहे.

या भागात भाजपने पक्षाचा चेहरा मानल्या जाणाऱ्या काही कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी नाकारली होती. बाणेर-औंध क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग ८ आणि ९ मध्ये माजी नगरसेवक बंडू ढोरे, अर्चना मुसळे, स्वप्नाली प्रल्हाद सायकर आणि अमोल बालवडकर या प्रमुख चेहऱ्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर स्वप्नाली सायकर वगळता इतरांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याचेही सांगितले जाते.

See also  शिवसेनेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांच्या वाढदिवसांच्या व पत्रकार दिनाच्या निमित्ताने करण्यात आला

त्यानंतर पक्ष संघटन उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रकाश बालवडकर, प्रल्हाद सायकर, विशाल गांधिले, सचिन पाषाणकर आणि उमा गाडगीळ यांसारख्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र या सर्वांनाच आश्वासनांवरच थांबावे लागल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने स्वीकृत नगरसेवकांची निवड केली असली तरी निष्ठावंत कार्यकर्त्यांना सातत्याने डावलले जात असल्याची भावना निर्माण झाल्यास त्याचा परिणाम आगामी निवडणुकांवर होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

दरम्यान, ऐनवेळी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडून आलेले अमोल बालवडकर हे सातत्याने खासदार मोहोळ यांच्यावर टीका करत असल्याचेही पाहायला मिळत आहे. मागील निवडणुकीत कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी त्यांनी जोरदार तयारी केली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना स्थायी समितीत स्थान देत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी पुढे केले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या सर्व घडामोडींमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षांतर्गत नाराजी कशी हाताळणार आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय कसा देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.