डायबेटिस जनजागृतीसाठी पुणे ते गोवा ४२५ कि.मी. धावण्याची अव्दितीय प्रवास मोहीम यशस्वी !

पुणे, ११ ऑक्टोबरः ब्ल्यूब्रिगेड स्पोटर्स फाऊंडेशनच्या वतीने डायबेटिस जनजागृतीसाठी आणि मधुमेही रूग्णांच्या उपचारासाठी निधी गोळा करण्याच्या हेतूने ४२५ किलोमीटरची पुणे ते गोवा धावण्याची अव्दितीय प्रवास मोहीम यशस्वी करण्यात आली. पुण्यातील अजय देसाई, युसूफ देवासवाला आणि प्रशांत पेठे यांनी हा विविध आव्हानांनी भरलेला, सह्याद्रीतील ४ वेगवेगळा घाट-वाटांतून पुण्यापासून गोव्यापर्यंतचा प्रवास ५ दिवसांत पूर्ण केला.

या आपल्या मोहीमेबद्दल सविस्तर सांगताना पुण्यातील अजय देसाई, युसूफ देवासवाला आणि प्रशांत पेठे म्हणाले की, आमच्या या धावण्याच्या मोहीमेचा मुख्य हेतू डायबेटिस संबंधित जनजागृती करणे आणि मधुमेहीरूग्णांच्या उपचारासाठी आवश्यक निधी उभारणे हा होता. मधुमेहामुळे त्रस्त अनेक रूग्णांना योग्य उपचार आणि मदत मिळावी, म्हणून आम्ही ही अनोखी अशी मोहीम आखली होती. या प्रवासाची सुरूवात आम्ही २४ सप्टेंबर २०२४ रोजी पुण्यातून केली आणि गोव्याच्या कलंगूट किनार्‍यावर २९ सप्टेंबरच्या दुपारी यशस्वीरित्या पूर्ण केली. आम्ही सलग ४ दिवस ८५ कि.मी. प्रत्येक दिवशी अंतर पार केले आणि अखेरच्या दिवशी १२५ कि.मी. धावून ही खडतर आणि आव्हानात्मक मोहीम व अविस्मरणीय प्रवास पूर्ण केला.

अजय देसाई, युसूफ देवासवाला आणि प्रशांत पेठे यांनी या प्रवासातील आव्हानांबद्दल सांगताना म्हणाले की, हे संपूर्ण ४२५ कि.मी. अंतर पूर्ण करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारीसह विविध आव्हानांसाठी आम्ही तयार होतो. या प्रवासात अनेक वळणे, रस्त्यांचे बांधकाम, वाहतूक, जड वाहनांची रहादारी आणि रात्रीची हालचाल, गरम वातावर, दमटपणा आणि कडक उन असे दिवस-रात्रीचे विषम हवामान, काही मार्गावरील खराब रस्ते यांसारख्या मोठ्या अडचणी आल्या. कात्रज घाट, खंबाटकी घाट, तवंडी आणि आंबोली घाट या आव्हानात्मक घाटांचा सामना तसेच २९९१ मीटर इतका एकूण चढ-उताराचा प्रवास आमच्या संपूर्ण टिमने मोठ्या धैर्याने आणि जिद्दीने पूर्ण केला.

आमच्या धावपटूंना पाठिंबा देणार्‍या आमच्या समर्थन टिमची भूमिका फार मोठी होती आणि आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. या आमच्या मोहीमेमध्ये गोपी नायर, विजय येनपुरे, हुजेफा अंदमानवाला, रशिदा देवासवाला , मंजित नाहल, रीमा मेहता, बाबासाहेब आतकिरे आणि शिरीष जानराव यांचा समावेश होता. त्यांच्या मेहनतीने आणि पाठींब्याच्या जोरावर आमचा हा प्रवास आम्ही यशस्वीपणे पूर्ण करू शकलो. आमच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आजरा घाट ते कलंगूट या १०० हून अधिक कि.मी.च्या टप्प्यामध्ये बाबासाहेब आतकिरे आणि शिरीष जानराव यांनी धावण्यासाठी संगत केली. या अंतिम ३० तासांच्या अत्यंत आव्हानात्मक टप्प्यावर त्यांचे मार्गदर्शन आणि साथ अत्यंत मोलाची ठरली.

आमची ही मोहीम म्हणजे जिद्द, संघर्ष आणि आव्हाने यांच्यावर विजय मिळवून डायबेटिस जनजागृती हा सामाजिक उपक्रम होता. आमच्या सर्वांच्यासाथीने आणि पाठींब्याच्या जोरावर ही मोहीम आम्ही पूर्ण करू शकलो, हीच आमच्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे.

See also  औंधमधील रस्ता रुंदीकरणासाठी पोलीस खात्याची जागा मिळणार - आमदार सिद्धार्थ शिरोळे