मुळशी : भोर वेल्हा मुळशीच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच शिवसेनेचा उमेदवार नसल्याने शिवसैनिक व शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यामध्ये काहीशी नाराजी आहे. यामुळे शिवसैनिक आपले मत कोणाच्या पारड्यात टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क बांधले जात आहेत.
शिवसेना पक्षाचे विभाजन झाल्यानंतर शिवसेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन्ही सेनेच्या माध्यमातून भोर वेल्हा मुळशी मतदार संघामध्ये निवडणूक लढवण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली जात होती. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या उमेदवारीमुळे जवळपास उमेदवारी मिळणार नाही हे निश्चित मानले जात होते व त्याप्रमाणे संग्राम थोपटे यांना उमेदवारी मिळाली. परंतु महायुतीकडून पक्ष फुटी नंतर शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढण्याची संधी मिळण्याची अधिक शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात होती. पण अचानक राजकीय फेरबदल करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या पक्षाकडून घड्याळ चिन्हावर उमेदवारी देण्यात आली.
यामुळे दोनही शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीचे सूर उमटले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने मुळशी तालुक्यातील शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली. तर शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून प्रबळ दावेद्वारांना उमेदवारी न देता अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे नाराजी निर्माण झाली. यामुळे मुळशी मधून महायुतीचे बंडखोर उमेदवार कुलदीप कोंडे तर महायुतीचे भाजपाचे बंडखोर उमेदवार किरण दगडे हे अपक्ष म्हणून रिंगणामध्ये उतरले आहेत.
भोर वेल्हा मुळशी मध्ये काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी पारंपारिक लढत सातत्याने झाली आहे. परंतु यंदा मात्र निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनाच नसल्याने तीनही तालुक्यांमध्ये शिवसैनिकांना कोणाचे काम करायचे असा प्रश्न पडल्याचे सध्यातरी पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संग्राम थोपटे यांना महाविकास आघाडीचा धर्म म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात असले तरी परंपरागत विरोध करत आलेल्या शिवसैनिकांच्या ते पसंतीस फारसे पडताना दिसत नाही.
तर भोर वेल्ह्यामध्ये शिवसेनेकडून मागील वेळी निवडणूक लढवली कुलदीप कोंडे यांना तर मुळशीतील स्थानिक महायुतीचा बंडखोर उमेदवार म्हणून किरण दगडे यांना नाराज शिवसैनिकांची पसंती मिळू शकते. भोर वेल्हा मुळशी विधानसभा मतदार संघामध्ये नाराज शिवसैनिकांची राजकीय भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष दाबून राहिले असून शिवसैनिकांची भूमिका ही यंदा निर्णायक ठरणार आहे.