पुणे – मुळा आणि मुठा नद्यांमधील बोपोडी आणि येरवडा भागातील जलपर्णी तातडीने हटविली जाईल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (बुधवारी) सांगितले.
छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मुळा आणि मुठा नदीत येरवडा, बोपोडी भागात जलपर्णीचा उद्रेक झाला आहे. ती हटविण्यासाठी आमदार शिरोळे यांनी महापालिकेचे पर्यावरण संवर्धन अधिकारी मंगेश दिघे यांच्या समवेत बैठक घेतली.
जलपर्णी हटविण्यासाठी १५ मार्च रोजी ठेकेदार नेमण्यात आले आहेत. त्या ठेकेदारांमार्फत भाऊ पाटील रोड एकता सोसायटी आणि येरवडा येथे फोफावलेली जलपर्णी तातडीने हटविली जाईल, असे आश्वासन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना दिले. तसेच होळकर पूल येथील पुलाखालील नदीतील जलपर्णी हटविण्याचे काम खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून करण्यात येत आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.