पुणे : चिमुकल्यांच्या आयुष्यात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करीत त्यांच्या पंखांना बळ देण्याकरिता क्लिन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लि.,पुणेच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून व निरंजन सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला आहे. पुणे शहरासह ग्रामीण भागातील ३० शाळांतील तब्बल १५०० गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेत त्यांना १६ प्रकारच्या शैक्षणिक वस्तू असलेले किट प्रदान करण्यात आले. केवळ पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहणा-या या विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या वाटा उज्ज्वल व्हाव्या, याकरिता हा प्रयत्न.
गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित कार्यक्रमाला क्लिन सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक कृष्णकुमार बूब, तौरल इंडिया प्रा.लि. चे संचालक भरत गीते, मुंबई उपनगरचे माजी जिल्हाधिकारी व महसूल प्राधिकरण सदस्य राजेंद्र क्षीरसागर, संगम कृषी सेवा संस्थेचे चेअरमन दिलीप शिंदे, राष्ट्रीय खो खो खेळाडू व म्हाडा अधिकारी संजय नाईक, संस्थेचे अध्यक्ष डॉ. नवनीत मानधनी, सचिव सीए दुर्गेश चांडक यांसह क्लिन सायन्सचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. क्लिन सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक अशोककुमार बूब यांचे उपक्रमाकरिता विशेष मार्गदर्शन मिळाले.
कृष्णकुमार बूब म्हणाले, सामाजिक कार्याला आर्थिक पाठबळ लागते. मात्र, केवळ आर्थिक पाठबळावर नाही, तर ते काम मनापासून केल्यास यशस्वी होते. कोणतेही काम करताना आपण लाज बाळगता काम नये. तरुणांनी निरंजन सेवाभावी संस्थेचा आदर्श घ्यावा. प्रत्येक काम आत्मियतेने केल्यास ते पूर्ण होते. त्यामुळे निरंजन सारख्या सेवाभावी संस्थेच्या पाठिमागे आम्ही कायम आहोत.
भरत गीते म्हणाले, युरोप सारख्या ठिकाणी नागरिकांची संख्या कमी होत चालली आहे. भारताकडे युवा पिढी सर्वाधिक असून संपूर्ण जगाला भारताकडून आशा आहे. आपले विद्यार्थी हेच देशाचे भविष्य आहे, तेच भारताचा झेंड सर्वत्र नेणार आहेत. केवळ परिस्थितीच नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनातील शंका आणि अपयशाची भिती हाच खरा अडथळा असतो. त्यामुळे कोणतेही क्षेत्र निवडले, तरी मनापासून काम करा. आम्ही कायम तुमच्या पाठिशी आहोत, असा सल्ला त्यांनी दिला.
राजेंद्र क्षीरसागर म्हणाले, आयुष्यात काय करायचे हे लवकर ठरवायला हवे. आपल्यासमोर स्वप्न असेल, तर ते साकार करण्यासाठी लवकर वाटचाल सुरु होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वप्न बघून ते पूर्ण करण्याकडे झेपावले पाहिजे. यासाठी चांगले मित्र, आई-वडिल आणि स्वत:चा निश्चय असणे आवश्यक आहे.
डॉ. नवनीत मानधनी म्हणाले, महाराष्ट्रातील २५०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेने घेतले आहे. दुष्काळग्रस्त बीड सह अहिल्यानगर आणि पुण्यासह आजूबाजूच्या ग्रामीण भागात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करुन गरजू व गरीब मुलांचे शैक्षणिक पालकत्त्व घेण्याचे कार्य संस्था अनेक वर्षे करीत आहे. यावर्षी महाराष्ट्रातील ७५ हून अधिक शाळा व संस्थांतील विद्यार्थ्यांचा या उपक्रमात समावेश करण्यात आला असून पिढीला कार्यक्रम अहिल्यानगर येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. संजय नाईक, दिलीप शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व विद्यार्थी व पालकांना खाऊच्या बॅग देण्यात आल्या. अभय जाजू यांनी सूत्रसंचालन केले.