यंदाचा राज्यस्तरीय भागवत धर्म पुरस्कार जेष्ठ पत्रकार  सुनील लांडगे यांना प्रदान

पंढरपूर : १९९० पूर्वीचे पालखी सोहळे व आत्ताचे पालखी सोहळे यामध्ये जमीन आसमानाचा फरक दिसून येतो . पालखी सोहळ्यातील बारीक सारीक घटना , त्याचे महत्त्व , रिंगण , धावा, भारुड  यासारखे अध्यात्मिक प्रसंग उत्तम तऱ्हेने मांडून विठ्ठल भक्तांना वारीची गोडी लावण्याचे काम पत्रकारांनी केले म्हणूनच हजाराचे सोहळे लाखात गेले . यामागे पत्रकारांचे मोठे योगदान असल्याचे मत संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

जळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताबाई संस्थानतर्फे देण्यात येणारा यंदाचा राज्यस्तरीय भागवत धर्म पुरस्कार जेष्ठ पत्रकार  सुनील लांडगे यांना देण्यात आला .

भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या राज्यातील पत्रकारांना संस्थानचे माजी अध्यक्ष सहकारमहर्षी कै. भाऊसाहेब ऊर्फ प्रल्हादराव पाटील यांच्या स्मरणार्थ २०१९ पासून भागवत धर्म प्रसारक पुरस्कार देण्यात येतो. यापूर्वी हा पुरस्कार सूर्यकांत भिसे, शंकर टेमघरे, मनोज मांढरे, राजेंद्रकृष्ण कापसे यांना देण्यात आला आहे. यंदाचा पुरस्कार देहू-आळंदी पालखी सोहळा आणि वारकरी संप्रदायातील वार्तांकनाची दखल घेत सुनील लांडगे यांना संत मुक्ताबाई संस्थानाचे अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या हस्ते देण्यात आले .

वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या लांडगे यांनी आषाढी वारी प्रसारासाठी वृत्तपत्राच्या माध्यमातून उल्लेखनीय
काम केले आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा लोकाभिमुख होण्यासाठी सन २००० पासून देहू ते पंढरपूर पायी वारी करून तुकोबारायांचा सोहळा प्रसार माध्यमातून असंख्य वैष्णवांपर्यंत पोहोचवला आहे. संत तुकाराम महाराज बीज सोहळा, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा अशा विविध सोहळ्यांचे वार्तांकन आणि त्याबद्दल विशेष लेख लिहून वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम केले आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी श्री क्षेत्र पंढरपूर येथील संत मुक्ताबाई मठात श्री विठ्ठलाची मूर्ती, मानाचा वारकरी फेटा आणि शाल असा पुरस्कार  देवून लांडगे यांना सन्मानित करण्यात आले .

लांडगे म्हणाले , संत मुक्ताबाई संस्थानच्या वतीने देण्यात आलेल्या या पुरस्काराने माझी अध्यात्मिक उंची वाढली आहे. हा पुरस्कार माझ्या आजवरच्या वारकरी सेवेचा सर्वोच्च सन्मान आहे .
या पुरस्कार वितरण समारंभास संत मुक्ताबाई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, विश्वस्त पंजाबराव पाटील, संदीप पाटील, सम्राट पाटील , पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, उपाध्यक्ष शंकर टेमघरे, सचिव ॲड विलास काटे, खजिनदार मनोज मांढरे, विश्वस्त राजेंद्रकृष्ण कापसे, राजेंद्र मारणे, विश्वास मोरे , जिल्हाध्यक्ष शहाजी फुर्डे पाटील , यशवंत सादुल, दत्तात्रय जोरकर , शशिकांत पाटील यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.

See also  अडीच लाख मुलांच्या शिक्षणाचा खेळ खंडोबा थांबवा, अधिनियम रद्द करा: आप चे आंदोलन