पुणे : पुण्यातील ज्ञानधारा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने, दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या २० विद्यार्थ्याना ‘छात्रवृत्ति योजना’ शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. हे सर्व विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या गरजू असून या शिष्यवृत्तीद्वारे त्यांना पुढील शिक्षणासाठी दहा हजार रुपये देण्यात आले.
ज्ञानधारा फाउंडेशन तर्फे दरवर्षी अशा पद्धतीने आर्थिक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मदत केली जाते. पात्र विद्यार्थ्यांची त्यासाठी निवड केली जाते. आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात. ज्ञानधारा फाउंडेशन ही पुण्यातील एक विविध विषयांमध्ये काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. प्रामुख्याने गरीब समाज घटक यांच्यासाठी शिक्षण, अन्नदान, कौशल्य आधारित शिक्षण, या विषयात महत्त्वाचे उपक्रम ही संस्था राबवते. शुधा नावाने अन्नदान प्रकल्प संस्थेच्या वतीने राबवण्यात येतो. दररोज सकस आहार आणि फळे यांचे वाटप प्रामुख्याने ग्रामीण विद्यार्थ्यांना देण्यात येते. दररोज अडीचशे जणांना अन्नदान केले जाते. शक्ती या प्रकल्पांतर्गत महिलांच्या सशक्तिकरणासाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते. त्यात टेलरिंग, ब्युटी, आणि विविध प्रकारचे कोर्स उपलब्ध करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम केले जाते. समर्थ प्रकल्पांतर्गत सर्वांना शिक्षण मिळण्यासाठी काम केले जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक प्रशिक्षण, शैक्षणिक लॅब्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी छात्रवृत्ति शिष्यवृत्ती आणि एम.एस.सी. आय. टी सर्टिफिकेशन शिष्यवृत्ती गरीब विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाते. विद्यार्थ्यांच्यामध्ये कौशल्य विकास करण्यासाठी आणि पुढील शिक्षणासाठी याद्वारे मदत केली जाते. प्रत्येक वर्षी यासाठी ५० विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचे वाटप केले जाते. ही शिष्यवृत्ती मिळण्यासाठी त्यांचे दहावीच्या आधारावर एक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आली होती. गेल्या सहा वर्षात ज्ञानधारा फाउंडेशनने हजारो लोकांना अशा विविध उपक्रमांमधून मदत केली आहे.