सुसगाव : सुसगाव परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना अरेरावी करून पैसे उकळणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या विरोधात अज्ञात व्यक्तीने सुस भगवती नगर, शेख कॉलेज परिसरात पत्रके वाटल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सुस भगवती नगर, शेख कॉलेज परिसरामध्ये हा रस्ता माझा आहे तो वापरायचा नाही. तसेच चार मजल्या पेक्षा जास्त बांधकाम करायचे नाही असे सांगून सर्वसामान्य नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याचे आरोप पत्रकामध्ये करण्यात आले आहेत.
तसेच गुंठेवारी नुसार जागा घेतलेल्या नागरिकांना लाईट मीटर कनेक्शन, पाण्यासाठी बोरवेल यासाठी पैसे द्यायचे व बांधकामासाठी लागणारे मशनरी व मटेरियल संबंधित व्यक्तीकडूनच घ्यायचे अशी दादागिरी केली जात असून वेळप्रसंगी शास्त्राचा भाग देखील गोरगरीब नागरिकांना दाखवला जात असल्याचे या पत्रकाद्वारे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. असे गंभीर आरोप असलेली सुसगाव परिसरातील एक मोठी व्यक्ती कोण असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे?
भगवती नगर व शेख कॉलेज परिसरामध्ये सर्वसामान्य कष्टकरी नागरिकांनी एक गुंठा, दोन गुंठे अशी जागा घेऊन घरे बांधलेली आहेत. हा परिसर पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैद्य खोदकाम देखील करण्यात आले आहे. परिसरात पत्रकाद्वारे नागरिकांनी आपल्या पुढील पिढीच्या भवितव्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर यांच्याकडे तक्रार करावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
सुसगाव परिसरामध्ये अशी पत्रके वाटप करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली असून सर्वसामान्य नागरिकांकडून पैसे उकळणाऱ्या व्यक्ती कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
























