पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसावेळी म्हणजे 9 फेब्रुवारी 2024 रोजी चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण दिलं जाईल अशी घोषणा केली होती. ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, त्या मुलींना वैद्यकीय,अभियांत्रिकी, लॉ,असो की 662 कोर्सेस असून यासाठी कुठलीही फी लागणार नाही, शिक्षण मोफत करणार असल्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली होती. पण ही घोषणा हवेतच जिरल्याची चर्चा आहे. कारण, अर्धा जून महिना उलटला, महाविद्यालयात प्रवेशही सुरू झाले. मात्र राज्य सरकारचा ना जीआर निघाला, ना अंमलबजावणी झाली.
महाविद्यालयामध्ये जाणाऱ्या मुलींना शिक्षणासाठी भरमसाठ फी भरावी लागत आहे. महाविद्यालयांमध्ये फी संदर्भामध्ये कोणताही शासनाचा जीआर नसल्याने महाविद्यालय मुलींना मोफत शिक्षण देत नाहीत. मुलींच्या पालकांना यामुळे महाविद्यालयामध्ये फी भरूनच ऍडमिशन घ्यावे लागत असून मंत्री महोदयांची ही लोकप्रिय घोषणा अंबलबजावणी करण्यासाठी होती का, की हा एक ‘जुमला’ होता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.