पुणे : पुणे महापालिका निवडणुकीतील सर्वात मोठा आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेला प्रभाग क्रमांक ९ सध्या मोठ्या उलटफेरीच्या केंद्रस्थानी आला आहे. स्थानिक आमदारांच्या असुरक्षिततेतून झालेल्या निर्णयांनी भाजपसमोरच संकट उभं केल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
भाजपचे माजी नगरसेवक आणि या भागातील प्रभावी चेहरा असलेले अमोल बालवडकर यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ पक्षांतर नाही, तर प्रभाग ९ मधील सत्तासमीकरणं ढवळून काढणारा राजकीय भूकंप मानला जात आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, कोथरूडमधून आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या अमोल बालवडकर यांनी स्थानिक पातळीवर चांगलीच हवा निर्माण केली होती. जरी चंद्रकांत पाटील यांचे तिकीट कापले जाणे शक्य नव्हते, तरीही चंद्रकांत पाटील यांनी घेतलेली आक्रमक भूमिका अनेकांच्या मते अनावश्यक ठरली. या भूमिकेमुळेच अमोल बालवडकर यांचे महत्त्व अधिक ठळक झाले आणि त्यांचे नाव प्रभाग ९ च्या चौकटीबाहेर जाऊन संपूर्ण शहरात पोहोचले.
बाणेर–बालेवाडी–पाषाण–सुस या पट्ट्यात भाजपचा सर्वात मजबूत आणि ओळखीचा चेहरा म्हणून अमोल बालवडकर यांची ओळख होती. मात्र, महापालिका निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा त्यांचे तिकीट कापल्याने या निर्णयाचे खापर थेट चंद्रकांत पाटील यांच्यावर फुटू शकते, अशी चर्चा आता उघडपणे रंगू लागली आहे.
“चंद्रकांत दादा पाटील यांनीच विधानसभेतील विरोधाचा वचपा काढला ” अशी चर्चा सुरु झाली आहे, ही बाब भाजपविरोधी वातावरण निर्मितीस कारणीभूत ठरू शकते.
राजकीय वास्तव पाहता, अमोल बालवडकर यांच्या बाहेर पडण्यामुळे प्रभाग ९ मधील भाजपची संघटनात्मक ताकद जवळपास निम्मी झाल्याचे चित्र आहे. विशेषतः राष्ट्रवादीचा पारंपरिक गढ मानल्या जाणाऱ्या पाषाण परिसरातून त्यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या बदलत्या राजकीय समीकरणांचा परिणाम केवळ प्रभाग ९ पुरता मर्यादित राहणार नाही. शेजारच्या प्रभाग क्रमांक ८ मध्येही याचे पडसाद उमटू शकतात, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
एकूणच, स्थानिक पातळीवरील असुरक्षिततेतून घेतलेले निर्णय भाजपसाठी स्वतःच तयार केलेले संकट ठरू लागले आहेत. प्रभाग ९ मधील ही घडामोड पुणे महापालिकेच्या एकूण निकालांवर किती मोठा प्रभाव टाकते, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.
























