पुणे | प्रतिनिधी : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ (बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस, महाळुंगे) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक महत्त्वपूर्ण आणि लोकाभिमुख निर्णय घेतला आहे. प्रभागातील नागरिकांना वाहतूक कोंडी व त्रास होऊ नये, यासाठी निवडणूक प्रचारादरम्यान कोणतीही वाहन रॅली न काढण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही अधिकृत उमेदवारांनी एकमताने घेतला आहे.
राजकीय प्रचारामुळे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण होतात, विशेषतः वाहन रॅलींमुळे वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वाढतात. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनहिताला प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. “जनहित हेच आमचं ब्रीद” या भूमिकेतूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
प्रभाग क्रमांक ९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार
गायत्री मोहन मेढे–कोकाटे, बाबुराव दत्तात्रय चांदेरे, पार्वती अजय निम्हण आणि अमोल रतन बालवडकर यांनी संयुक्तपणे हा निर्णय जाहीर केला आहे. नागरिकांशी थेट संवाद, घराघरांत भेटी, समस्या ऐकून घेणे आणि विकासकामांची माहिती देणे, अशा मार्गाने प्रचार केला जाणार असल्याचे उमेदवारांनी सांगितले.
या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत होत असून, लोकांच्या सोयीसाठी घेतलेला हा निर्णय आदर्श ठरत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
























