खडकवासलाः पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांना ग्रामपंचायत च्या धर्तीवर कर लावण्याचे आश्वासन प्रशासनाकडून वारंवार देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी न झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या प्रश्नावर आता हवेली तालुका नागरिक कृती समिती आक्रमक झाली असून त्यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.
२०१७ व २०२० अशा दोन टप्प्यात हवेली तालुक्यातील ३४ गावे ही पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. यातील फुरसुंगी व उरुळी देवाची या दोन गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्यात आली. ग्रामपंचातींकडून या गावांतील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने या गावांत विकासा अभावी बकालपणा वाढला होता. त्यामुळे न्यायालयीन लढा देऊन या गावांचा पालिकेत समावेश करण्यात आला. मात्र अद्यापही या गावांत पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव असल्याचे चित्र आहे. मात्र प्रशासन या बाबींकडे दुर्लक्ष करून अन्यायकारक कर या गावांतील नागरिकांकडून वसूल करत असल्याचा आरोप हवेली कृती समितीने केला आहे.
हवेली तालुक्यातील समाविष्ट गावे आणि नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना वाढीव मिळकत कराचा फटका बसत आहे. प्रशासनाने यापूर्वी बैठकांमध्ये नागरिकांना कर सवलत देण्याचे आणि दंडव्याज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, नवीन आर्थिक वर्ष जवळ आले तरी अद्याप सवलतीचा कोणताही निर्णय झालेला नाही.आश्वासन दिल्याप्रमाणे मिळकत करात तातडीने सवलत लागू करावी.
चुकीच्या पद्धतीने लावलेली कर आकारणी दुरुस्त करावी. थकीत करावरील दंडव्याज पूर्णपणे माफ करण्यात यावा. या मागण्यांसंदर्भात लवकरच महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचे हवेली तालुका नागरी कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांनी सांगितले.
यावेळी कृती समितीचे उपाध्यक्ष पोपटराव खेडेकर, मिलिंद पोकळे, संदीप चव्हाण, संतोष ताठे आदी पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत जर येत्या काही दिवसांत पालिकेने अन्यायकारक कर कमी केला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. .
























