पुणे : वाकडेवाडी येथील पीएमसी कॉलनीमधील रहिवासी इमारतींच्या भिंतींवर मोठमोठी झाडे उगवल्याने इमारतींच्या बांधकामाला धोका निर्माण झाला आहे. तसेच पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता, विजेचा शॉक बसण्याची समस्या आणि इमारतींमधील कचऱ्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुणे महापालिका प्रशासनाकडे केली आहे. येत्या १५ दिवसांत समस्यांचे निराकरण न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
पीएमसी कॉलनीतील इमारतींच्या भिंतींवर मोठ्या प्रमाणात झाडे उगवली असून, त्यांच्या मुळांमुळे भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे इमारतींच्या संरचनात्मक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. झाडांमुळे विंचू, किडे व इतर विषारी जीवजंतू घरांमध्ये शिरत असल्याने लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे.
कॉलनीतील पाण्याच्या टाक्यांची गेल्या १५ ते २० वर्षांपासून स्वच्छता करण्यात आलेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, पाण्याच्या टाकीजवळ विजेचा शॉक बसत असल्याची गंभीर समस्या देखील आहे. दोन इमारतींच्या मधील मोकळ्या जागेत कचरा साचल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे. घंटागाडी नियमित येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
या सर्व समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करून झाडे काढणे, भिंतींची दुरुस्ती, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण, विद्युत दोष दूर करणे आणि कचरा व्यवस्थापन सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महापालिका आयुक्त, शिवाजीनगर-घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त, चतु:श्रृंगी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आणि वृक्ष प्राधिकरण विभागाला निवेदन देण्यात आले. यावेळी मनसे वाहतूक जिल्हा उपाध्यक्ष अँथोनी आढाव उपस्थित होते.
“नागरिकांच्या आरोग्याशी आणि जीविताशी संबंधित समस्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये. दुर्घटना घडण्यापूर्वीच उपाययोजना कराव्यात. १५ दिवसांत समस्यांचे निराकरण न झाल्यास संबंधित कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा सुहास निम्हण यांनी दिला.
















