हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी; दुसऱ्यांदा मानाच्या किताबावर नाव

वाघोली : रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या आयोजनातून पार पडलेल्या 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या समारोप सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली. कुस्तीप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि जल्लोषमय वातावरणात हा समारोप सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

६८ व्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेत माती विभागात सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाडने, तर गादी विभागात नाशिकच्या अनुभवी हर्षवर्धन सदगीरने दिमाखदार विजय नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे मानाच्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी आता सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात रंगतदार लढत झाली.विशेष म्हणजे, हे दोन्ही मल्ल अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या तालमीत तयार झालेले असून एकाच आखाड्यात सराव करणारे आहेत. त्यामुळे अंतिम सामना अधिकच उत्कंठावर्धक ठरली.

माती विभागातील अंतिम लढतीत सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाडने हिंगोलीच्या सिकंदर शेखवर ३-० अशी मात करत अंतिम फेरी गाठली. सुरुवातीपासूनच अटीतटीची, तुल्यबळ आणि काळजाचा ठोका चुकवणारी ही लढत ठरली. बाहुबली अशी ओळख असलेल्या महेंद्रने आक्रमक खेळाची सुरुवात करत प्रतिस्पर्ध्यावर दबाव निर्माण केला. अनेक मैदानं गाजवलेल्या या दोन्ही दावेदारांमधील सामना कुस्तीशौकिनांसाठी उत्कंठा शिगेला पोहोचवणारा ठरला.

गादी विभागातील अंतिम फेरीत नाशिकच्या अनुभवी हर्षवर्धन सदगीरने जय पाटीलवर एकतर्फी वर्चस्व गाजवले. सुरुवातीपासूनच खेमीची पकड घेत गुण मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या हर्षवर्धनने अवघ्या अडीच मिनिटांत तांत्रिक गुणांच्या आधारे जय पाटीलचा १०-० असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. त्याच्या अनुभवसंपन्न आणि अचूक खेळामुळे गादी विभागातील ही लढत एकतर्फी झाली.

महाराष्ट्र केसरीच्या अंतिम कुस्तीला सुरुवात होताच महेंद्रने आक्रमक खेळाला सुरवात केली. त्यामध्ये महेंद्र याला 1 गुण देण्यात आला. हर्षवर्धन याने शांत आणि संयमी खेळ करत महेंद्र याचे आक्रमण थोपवत होता. महेंद्र याने धोबीची पकड करण्याचा प्रयत्न हर्षवर्धन याने धुडकावून लावली. हर्षवर्धन याने हप्ते डावाची पकड केली पण गुण मिळवता आला नाही. पहिल्या फेरीत दोघांनी 1-1 अशी बरोबरी गाठली.

See also  ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन; पुण्यातील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

दुसऱ्या फेरीत महेंद्र याने पटाला लागण्याचा प्रयत्न केला पण गुण मिळवता आला नाही. महेंद्र याला निष्क्रियता असल्याचे सांगत 1 गुण हर्षवर्धन याला देण्यात आला. त्यानंतर हर्षवर्धन याने पटाला लागत 2 गुण मिळवला. आणि हर्षवर्धन याने महेंद्र याचा 4-3 असा पराभव करीत डबल महाराष्ट्र केसरीचा ‘किताब पटकावला.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात बोलताना आयोजक रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांनी, “केवळ ३७ दिवसांत ही स्पर्धा भरवण्याचे शिवधनुष्य आम्ही उचलले आणि ते वाघोली ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे शक्य झाले. विजेत्या मल्लांना भरघोस पारितोषिक देण्याचा आमचा मानस पूर्ण झाला. कुस्तीची ग्रामीण चौकट मोडून ती शहरात आली पाहिजे. कॉर्पोरेट क्षेत्रानेही कुस्तीला राजाश्रय द्यावा, हा या स्पर्धेमागचा हेतू आहे,” असे सांगितले.

या पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, शिक्षणमंत्री दादा भुसे, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग, आयोजक रामकृष्ण सातव, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, सरचिटणीस योगेश दोडके, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, कुस्ती पंच प्रमुख दिनेश गुंड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या पुढाकारातून आणि भव्य नियोजनातून पार पडलेल्या या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा समारोप सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला. अंतिम दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आयोजक रामकृष्ण अण्णा सातव पाटील, आमदार विजय बापू शिवतारे, आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आबा कटके, खासदार अमोल कोल्हे, आमदार अमित गोरखे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक, आमदार राहुलदादा कुल, शहराध्यक्ष नाना भानगिरे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर रवि लांडगे, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार महेशदादा लांडगे, आमदार अण्णा बनसोडे, आमदार योगेश टिळेकर, आमदार भीमराव अण्णा तापकीर, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी आमदार सुनील टिंगरे, आमदार सुनील शेळके, छत्रपती संभाजीराजे भोसले, मंत्री दादा भुसे, अभिनेते जॅकी श्रॉफ, पीसीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

See also  केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना तालमीतील मित्र त्यांच्याच बंदोबस्तासाठी भेटतो तेव्हा...

राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, औद्योगिक आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेच्या प्रतिष्ठेत मोठी भर पडली. विविध संस्थांचे पदाधिकारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी, तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आयोजकांचे अभिनंदन केले.

वाघोलीत उभारण्यात आलेल्या भव्य क्रीडानगरीत पार पडलेली ही स्पर्धा केवळ कुस्तीपुरती मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या समृद्ध क्रीडा परंपरेचा उत्सव ठरली. राज्यभरातून आलेल्या मल्लांनी आपल्या कौशल्याची छाप पाडली, तर हजारो कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपातील आयोजनामुळे सर्व स्तरांतून रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. महाराष्ट्र केसरीसारख्या मानाच्या स्पर्धेचे वैभव या यशस्वी समारोपामुळे अधिक उंचावल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.