लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रादेशिक कार्यशाळेचे पुण्यात आयोजन.

पुणे : राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय (NRCD), जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन विभाग, नवी दिल्ली यांच्या वतीने ‘Small River Rejuvenation Framework’ या विषयावरील प्रादेशिक कार्यशाळेचे आज केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन संस्था (CWPRS), खडकवासला, पुणे येथे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेचे उद्घाटन पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम, यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय भूजल मंडळ (CGWB), NEERI, CWPRS, IIT, NIT तसेच विविध राज्यांतील तज्ज्ञ, अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

लघु नद्यांचे पुनरुज्जीवन करताना केवळ नदीपात्राची स्वच्छता न करता नदीचा संपूर्ण जलसंधारण क्षेत्र, जलस्रोत, भूजल, पर्यावरणीय प्रवाह, प्रदूषण नियंत्रण आणि स्थानिक समुदायाचा सहभाग या सर्व बाबींचा एकत्रित विचार करण्याची आवश्यकता आहे. याच अनुषंगाने लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी देशपातळीवर प्रभावी आणि शाश्वत आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेत जल-पर्यावरणीय पुनर्स्थापना, जलस्रोतांचे शाश्वत व्यवस्थापन, भूजल पुनर्भरण, जलसंधारण क्षेत्र उपचार, नदीपाणी गुणवत्ता मूल्यांकन, नदी प्रदूषण नियंत्रण, नदी खोरे व उपखोरे नियोजन, विकेंद्रित सांडपाणी प्रक्रिया आणि Nature-Based Solutions या विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन झाले.

तसेच धोरण व वित्तीय नियोजन, शासनाची भूमिका, लोकसहभाग, स्वयंसेवी संस्था व नागरी समाजाचा सहभाग यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील घोड नदीच्या पुनरुज्जीवनाचा अनुभव यावेळी विशेषत्वाने मांडण्यात आला.

कार्यशाळेच्या पुढील सत्रात विविध राज्यांतील प्रतिनिधींच्या सहभागातून विषयवार कार्यगट चर्चा घेण्यात आली. झरे व जलस्रोत पुनरुज्जीवन, पर्यावरणीय प्रवाह, औद्योगिक व घरगुती प्रदूषण नियंत्रण, नैसर्गिक उपाययोजना तसेच स्वयंसेवी संस्था आणि नागरी समाजाची भूमिका या विषयांवर कार्यगटांनी विचारमंथन करून आपल्या शिफारशी सादर केल्या.

यावेळी CWPRS येथील विविध जलसंबंधित मॉडेल्सची पाहणीही करण्यात आली. या कार्यशाळेमुळे विविध राज्यांमध्ये राबविण्यात येत असलेल्या नदी पुनरुज्जीवनाच्या उपक्रमांतील अनुभव, तांत्रिक ज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण होऊन लघु नद्यांच्या संवर्धनासाठी अधिक प्रभावी, शाश्वत व एकात्मिक धोरण विकसित करण्यास मदत होणार आहे.

See also  निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार समन्वयक अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडावी-डॉ. सुहास दिवसे

आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी पुणे शहरातील नदी व जलस्रोतांच्या संवर्धनासाठी एकात्मिक पद्धतीने सुरू असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या तांत्रिक व धोरणात्मक चर्चांचे महत्त्व अधोरेखित केले. लघु नद्यांचे पुनरुज्जीवन हे पर्यावरण संवर्धनासोबतच भविष्यातील जलसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.