पाषाण-सुतारवाडी लिंक रोडवरील वीजवाहिन्या भूमिगत करा; पर्यावरणप्रेमी नागरिकांची मागणी

पाषाण : पाषाण-सुतारवाडी लिंक रोड परिसरातील महावितरणच्या खांबांवरील जुन्या वीजवाहिन्या भूमिगत करण्यात याव्यात, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या वीजवाहिन्यांमुळे रस्त्यालगतच्या झाडांच्या वाढीस अडथळा निर्माण होत असून, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात झाडांची छाटणी करावी लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पाषाण-सुतारवाडी येथील आयटीआय ग्राउंडसमोरील महावितरणची खांबावरील जुनी वीजवाहिनी अद्याप सुरू आहे. या वीजवाहिनीच्या मार्गात येणाऱ्या झाडांच्या फांद्यांची वारंवार छाटणी केली जाते. झाडांची मधोमध व मोठ्या प्रमाणात छाटणी होत असल्याने त्यांच्या नैसर्गिक वाढीवर परिणाम होत आहे. तसेच झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांना स्पर्श करण्याची शक्यता असल्याने विद्युत पुरवठ्यातही अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

गिरीराज चौक ते साई चौक या परिसरातील झाडांना अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिन्या भूमिगत करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वीजवाहिन्या भूमिगत केल्यास झाडांची अनावश्यक छाटणी टाळता येईल, पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि वीजपुरवठ्याशी संबंधित अडथळेही कमी होण्यास मदत होईल.

महावितरणने या परिसरातील वीजवाहिन्यांचे सर्वेक्षण करून पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन उपाययोजना म्हणून भूमिगत वीजवाहिन्यांचा प्रस्ताव तातडीने राबवावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

See also  पालिकेच्या नाकावर टिच्चून रस्त्यांवर अनधिकृत आठवडे बाजार सुरूच