पुणे: भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम हायस्कूल, धनकवडी, पुणे येथे ‘ॲथलेटिका’ या क्रीडा व तंदुरुस्ती उपक्रमाचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, संघभावना आणि आत्मविश्वास विकसित करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, सरस्वतीपूजन आणि डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी मा. श्री. अमोल बुचडे, रुस्तम-ए-हिंद आणि महाराष्ट्र केसरी, मा. डॉ. बाबामामा शिंदे, अध्यक्ष, भारती परिवार, डॉ. स्वप्नील विधाते, संचालक, क्रीडा विभाग, भारती विद्यापीठ आणि डॉ. नेताजी जाधव, प्राचार्य, भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, पुणे उपस्थित होते.
भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समिती, पुणे यांच्या अध्यक्षा श्रीमती विजयमाला पतंगराव कदम यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे उपक्रमाला नवी दिशा आणि ऊर्जा मिळाली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना क्रीडा हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचे आवाहन केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका मिस माधवी के. यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमांतर्गत दररोज दुपारी ३.०० ते ४.०० या वेळेत बैठे तसेच मैदानी खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे. नियमित क्रीडा सहभागातून विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच नेतृत्वगुण, संघभावना आणि आत्मविश्वास विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर या उपक्रमात विशेष भर देण्यात आला आहे. जर्मन भाषा शिक्षण, क्रीडा उपक्रम, स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आणि पूरक अध्यापन यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा भाषिक, बौद्धिक आणि शारीरिक विकास साधून त्यांना भविष्यातील जागतिक संधींसाठी सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे.
“जोश भरारी, स्वप्नांची तयारी;
यशाच्या दिशेने आमची स्वारी!”
या उत्साहपूर्ण घोषवाक्यासह ‘ॲथलेटिका’च्या उद्घाटन सोहळ्याची सांगता झाली.
















