वीज मीटर कनेक्शन न देताच ग्राहकाला आले हजारोंचे बिल ; सुसगाव येथे महावितरणचा गलथान कारभार उघड

सुस : सुसगाव मध्ये महावितरणने एका ग्राहकाला वीज मीटर न देताच वीज पाठवले असून विज बिल न भरल्यास कनेक्शन तोडण्याची कारवाई करणारा असल्याचे देखील सांगितले. यामुळे वीज मीटर न बसवलेल्या ग्राहकाला विज बिल देण्याचा पराक्रम महावितरण ने केला आहे.

सहसा वाढीव बिल येण्याच्या तक्रारी अथवा मीटर रिडींग न घेण्याच्या तक्रारी या सातत्याने होत आहे परंतु वीज मीटर न देताच वीज बिल देण्याचा प्रकार घडल्याने महावितरणच्या गलथान कारभाराचा नमुना निमित्ताने उघड झाला आहे.

सुसगाव मध्ये श्री भैरवनाथ लीगल सर्विसेस या नावाने वीज कनेक्शन व वीज मीटर बसवण्यासाठी ची प्रक्रिया मार्च महिन्यामध्ये करण्यात आली होती. वीज मीटर साठी आवश्यक असलेले शुल्क देखील भरण्यात आले होते.

त्यानुसार 26 मार्च 2024 रोजी मीटर जोडून वीज पुरवठा सुरू करण्यात आल्याचे दाखवण्यात आले. परंतु प्रत्यक्षात मात्र वीज मीटर ग्राहकाला देण्यातच आला नव्हता. त्यानंतर जून महिन्यामध्ये 5710 रुपयांचे बिल ग्राहकाला अदा करण्यात आले. वीज मीटर न बसवतात महावितरण कंपनीच्या औंध बाणेर विभागाकडून बिल देण्यात आल्याने श्री भैरवनाथ लीगल सर्विसेस सुसचे मालक विशाल पवार यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयात संपर्क साधला. दरम्यान विशाल पवार यांना विज बिल न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्यात येईल असे सांगितले परंतु वीज कनेक्शन दिलेच नाही तर तोडणार कसे हा प्रश्न निर्माण झाल्यावर महावितरणच्या लक्षात आपली चूक आली.

पूर्ण प्रक्रिया होऊन देखील वीज मीटर का जोडण्यात आला नाही? भैरवनाथ लीगल सर्विसेस साठी उपलब्ध करण्यात आलेला नवीन जोडणीचा मीटर अन्य कोणाला देण्यात आला आहे का याची चौकशी करण्यात यावी. तसेच नवीन मीटर साठी पैशांची मागणी करण्यात आली होती का याची देखील चौकशी करण्यात यावी व कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

नवीन मीटर जोडण्यासाठी अतिरिक्त पैशांची मागणी होते. तातडीने मीटर बसवून देण्यासाठी अतिरिक्त पैसे कर्मचाऱ्यांकडून घेतले जातात तसेच अनेकदा मीटर रिडींग न घेता मोठ्या प्रमाणात बिल दिले जाते. यामुळे ग्राहकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच सुसगाव परिसरात मीटर देताना आणखीन काही ठिकाणी असे प्रकार घडले आहेत का अथवा अतिरिक्त पैसे घेण्यात आले आहेत का याची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

See also  वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम