पुणे: पुणे महानगरपालिकेत भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) विरोधात बसला आहे. परंतु विरोधात बसलो म्हणजे विरोधी पक्षाच्या नगरसेवकाचे संपूर्ण बजेट काढून घेणे, हा त्या नगरसेवकावर नाही तर त्या प्रभागातील नागरिकांवर होणारा अन्याय आहे, अशी टीका पुणे मनपा विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनी केली आहे.
प्रतिक्रियेत विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या विषयाचा उल्लेख केला. अमोल बालवडकर हे मूळचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक होते. भाजपने त्यांना तिकीट नाकारल्यानंतर अजितदादांनी त्यांना बोलावून राष्ट्रवादी कडून तिकीट दिले. राष्ट्रवादीच्या भक्कम पाठिंब्यावर आणि लोकप्रियतेमुळे ते आणि बाबुराव चांदेरे हे दोघेही निवडून आले.
निवडणूक संपल्यानंतर राजकीय वैमनस्य, राजकीय ईर्ष्या संपणे आवश्यक असते. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून सूडबुद्धीने बालवडकर यांचे बजेट पूर्णतः काढून टाकण्यात आले, त्यांचे बजेट झिरो करण्यात आले आहे. नगरसेवकाने सुचवलेली विकासकामे ही स्वतःच्या घरापुरती नसतात, तर ती संपूर्ण प्रभागासाठी, नागरिकांसाठी अत्यावश्यक असतात. केवळ राजकीय हेतूने अशा प्रकारे बजेट काढून घेणे हे सत्ताधारी भाजपला शोभा देत नाही, असे निकम म्हणाले.
बालवडकर यांनी कोथरूडचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत करण्यात आलेल्या विकासकामांची चौकशी करावी असा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात सोशल मीडियावर जाणीवपूर्वक चुकीच्या पोस्ट टाकून बदनामी केली जात असल्याचा आरोपही बालवडकर यांनी केला आहे, असे निकम यांनी सांगितले.
हा केवळ अमोल बालवडकर यांच्यावर अन्याय नाही, तर बाणेर, बालेवाडी आणि पाषाण परिसरातील नागरिकांवर होणारा अन्याय आहे. अशा प्रकारचा पायंडा पडला तर तो अत्यंत वाईट ठरेल आणि त्याची किंमत भविष्यात अनेकांना भोगावी लागेल, असा इशाराही निलेश निकम यांनी दिला आहे.
“सत्ताधाऱ्यांनी कुणावरही अन्याय होऊ देणार नाही याची काळजी घ्यावी,” असे आवाहन त्यांनी केले आहे.
















