आळंदीतील कीर्तन महोत्सवात मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; तुकाराम महाराजांची तपोभूमी वाचवण्यासाठी मराठा महासंघाचे धारकरी रस्त्यावर उतरणार

आळंदी : मराठवाड्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवर चिंता व्यक्त करत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या तपोभूमीचा विध्वंस थांबवण्यासाठी वारकऱ्यांच्या साथीने अखिल भारतीय मराठा महासंघाचे धारकरी रस्त्यावर उतरतील, असा निर्धार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप यांनी व्यक्त केला.

श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे ह.भ.प. जगन्नाथ शेंडगे पाटील यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तन महोत्सव आणि ज्ञानेश्वरी कंठस्थ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवर्य कुंभार गुरुजी वारकरी संस्था, अखिल भारतीय मराठा महासंघाची आध्यात्मिक वारकरी आघाडी आणि जगद्गुरू तुकाराम महाराज सामाजिक आध्यात्मिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन बब्रुवान शेंडगे यांनी केले होते.

या वेळी मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी संघटनात्मक पातळीवर नियोजन केले जाणार असल्याचे ज्ञानेश्वर संस्थान आळंदी कमिटीचे विश्वस्त ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर यांनी सांगितले. सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षीय भाषणात दिलीप दादा जगताप म्हणाले, “अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी संघटनात्मक बांधणी करून आगामी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या तपोभूमीचा सुरू असलेला विध्वंस थांबवणे ही आपली जबाबदारी आहे. वारकरी संप्रदायाच्या साथीने मराठा महासंघाचे धारकरी रस्त्यावर उतरून हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी संघर्ष करतील.”

पर्यावरणाचे रक्षण आणि भावी पिढ्यांचे उज्ज्वल भविष्य लक्षात घेऊन संत तुकाराम महाराजांची तपोभूमी सुरक्षित ठेवण्यासाठी व्यापक जनजागृती आणि आंदोलन उभारण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला मुंबईहून मराठा महासंघाच्या राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये संयुक्त सरचिटणीस न्यायमूर्ती राजेश घाणेकर, कार्याध्यक्ष महेश सावंत, उपाध्यक्ष धोंडू जाधव, मुंबई शहर अध्यक्ष अविनाश राणे आणि चेंबूर विभागाचे अध्यक्ष किशोर घाग यांचा समावेश होता.

मराठवाडा विभागातून मराठा महासंघाचे अध्यक्ष धाराजी भुसारी, आध्यात्मिक आघाडीचे रामभाऊ मोहिते पाटील, परभणी जिल्हाध्यक्ष संतराम डुकरे पाटील, बीड जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराम सोंडगे, अखिल भारतीय भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर कोकाटे उपस्थित होते.

यावेळी ह.भ.प. बालासाहेब मोहिते पाटील, संजय दादा घुंडरे पाटील, ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अजित वडगावकर, संत चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश देवराव काळे, ह.भ.प. आत्माराम शास्त्री जाधव, ह.भ.प. दिनू भाऊ शेंडगे, ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज कोठुळे, ह.भ.प. सुनील महाराज अंडील आणि शिवाजीराव मस्के पाटील यांची उपस्थिती होती. या मान्यवरांनीही विविध विषयांवर आपले विचार मांडले.

See also  सेवा पंधरवडा निमित्त भाजपा तर्फे आरोग्य शिबिर

या सोहळ्यात ज्ञानेश्वर माऊली गोरे यांना ज्ञानेश्वरी कंठस्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल उपस्थित वारकरी आणि मान्यवरांनी अभिनंदन केले. दरवर्षी या पुरस्काराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे दिलीप दादा जगताप यांनी जाहीर केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्हा आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष ह.भ.प. शंकर महाराज फपाळ, ह.भ.प. प्रमोद महाराज काळे, ह.भ.प. सारंगधर महाराज क्षीरसागर यांच्यासह आयोजन संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.