ज्येष्ठ नागरिकांनी घडविला आदर्श; निरामय हास्ययोग क्लबच्या वतीने स्मार्ट सिटी गार्डनची स्वच्छता

बाणेर : पुणे महानगरपालिका व स्मार्ट सिटी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुरवस्था झालेल्या बाणेर येथील जुपिटर हॉस्पिटल रोडवरील स्मार्ट सिटी गार्डनची स्वच्छता निरामय हास्ययोग क्लबच्या ज्येष्ठ नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने केली. विशेष म्हणजे, या स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या बहुतांश नागरिकांचे वय ७० वर्षांपेक्षा अधिक असूनही त्यांनी उत्साहाने श्रमदान करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला.

जुपिटर हॉस्पिटल रोडवरील या स्मार्ट सिटी गार्डनमध्ये निरामय हास्ययोग क्लबचे ज्येष्ठ नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून दररोज सकाळी सहा वाजता एकत्र येतात. हास्ययोग, योगासने आणि विविध व्यायाम करून ते आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देत आहेत. मात्र, लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या उद्यानाची गेल्या काही वर्षांपासून योग्य देखभाल होत नसल्याने त्याची दुरवस्था झाली आहे.

उद्यानात नियमित स्वच्छता होत नसल्याने ठिकठिकाणी कचरा, गवत व झाडाझुडपांचा पसारा वाढला आहे. तसेच सुरक्षारक्षक नसल्यामुळे काही तरुणांकडून येथे मद्यपान, गुटखा खाऊन थुंकणे आणि कचरा करणे असे प्रकार होत असल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.या पार्श्वभूमीवर १ सप्टेंबर रोजी निरामय हास्ययोग क्लबच्या सदस्यांनी एकत्र येत उद्यानाची स्वच्छता केली. हातात झाडू, पोती आणि इतर साहित्य घेऊन ज्येष्ठ नागरिकांनी गवत, पालापाचोळा व कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला.

“वय वाढले तरी उत्साह कमी झालेला नाही; आरोग्याबरोबरच समाजासाठीही काहीतरी करण्याची भावना असली पाहिजे,” असा संदेश या श्रमदानातून ज्येष्ठ नागरिकांनी दिला.पुणे महानगरपालिकेने या उद्यानाची तातडीने देखभाल-दुरुस्ती करून नियमित स्वच्छता करावी, तसेच सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी यावेळी निरामय हास्ययोग क्लबच्या सदस्यांनी केली.

See also  औंध येथील मुख्य पाणीपुरवठ्याची लाईन दुरुस्तीचे काम वेगाने सुरू सामाजिक कार्यकर्ते अरविंद पाटील यांच्या पाठपुराव्याला यश