स्वर्गीय खासदार विठ्ठलराव तुपे पाटील स्मार्ट लर्निंग स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात

हडपसर, पुणे : डी. पी. रोड, माळवाडी, हडपसर येथील स्वर्गीय खासदार विठ्ठलराव तुपे पाटील स्मार्ट लर्निंग स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी एक दिवसासाठी शिक्षकांची भूमिका स्वीकारत अध्यापनासह शाळेच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांचे कर्तव्य, जबाबदारी आणि मेहनत जवळून अनुभवता आली.

कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी अस्मिता मॅडम यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व तसेच विद्यार्थ्यांच्या जीवनातील शिक्षकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, आत्मविश्वास, विचार करण्याची क्षमता आणि जीवनमूल्ये रुजवतात, असे त्यांनी सांगितले.

शिक्षक दिनाचे विशेष आकर्षण ठरले ते इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी साकारलेली शिक्षकांची भूमिका. विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे अध्यापन करण्याबरोबरच शाळेतील दैनंदिन कामकाजाच्या जबाबदाऱ्याही पार पाडल्या. या उपक्रमातून शिक्षकांचे काम किती जबाबदारीचे आणि आव्हानात्मक आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली.

यावेळी सोहम पांचाळ याने मुख्याध्यापकाची भूमिका साकारत शाळेचे कामकाज आत्मविश्वासाने सांभाळले.विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन केले. संगीत खुर्ची, गेसिंग गेम, फुगा फुगवून फोडणे आदी खेळांमध्ये शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शिक्षकांचा उत्साह आणि विद्यार्थ्यांचा जल्लोष यामुळे शाळेचे वातावरण आनंदमय झाले.यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे व मनोगते सादर करून शिक्षकांप्रती असलेला आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमात सारिका मॅडम, वंदना मॅडम, अनुराधा मॅडम, अश्विनी मॅडम, नांदगुडे मॅडम, विद्या मॅडम, उमा मॅडम, शर्मिला मॅडम, चैत्राली मॅडम, प्रीती मॅडम, गावडे सर, पाटील सर, सुनील सर, सुरज सर, जाधव मावशी, जगताप मावशी, मयुरी दीदी, चव्हाण मावशी, वैभवी दीदी, कृष्णा भैया, ऋतुराज भैया, बडदे मामा आणि किरण मामा यांनी विविध खेळांमध्ये सहभाग घेतला.

See also  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बनावट पदवी प्रमाणपत्र रॅकेटचा संशय; रिक्षाचालकाचा गंभीर दावा, चौकशी सुरू

शाळेचे मुख्याध्यापक श्री. विनायक पुणेकर सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत शिक्षकांची भूमिका साकारलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी घेतलेला हा अनुभव त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन इयत्ता सातवीचे वर्गशिक्षक अक्षयकुमार कांबळे सर, सलमा शेख मॅडम आणि कृष्णाली काटमोरे मॅडम यांनी केले. त्यांच्या नियोजनामुळे शिक्षक दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारून शिक्षकांच्या जबाबदारीचा अनुभव घेतला, तर शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसोबत खेळ आणि विविध उपक्रमांचा मनमुराद आनंद लुटला. त्यामुळे यंदाचा शिक्षक दिन शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आनंद, कृतज्ञता, संस्कार आणि प्रेरणेचा अविस्मरणीय अनुभव ठरला.