पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अनंतराव पवार महाविद्यालय, पिरंगुट येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

पिरंगुट (ता. मुळशी) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालय, पिरंगुट येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो हे होते. यावेळी व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. बी. आर. घोडके, ज्येष्ठ प्राध्यापक प्रा. नरंगलकर सर, प्रा. प्रकाश पांगारे, ग्रंथपाल प्रा. अविनाश हुंबरे यांच्यासह कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक मंडळींचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांमध्ये प्राध्यापकांची भूमिका निभावली होती, त्यांचाही सन्मान प्राचार्य लोबो यांच्या हस्ते या कार्यक्रमात करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो म्हणाले, “शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून तो विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देणारा शिल्पकार असतो. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही शिक्षकाचे स्थान अबाधित आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर करून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करावा.”

सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. बी. आर. घोडके यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “गुरू-शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीची खरी ओळख आहे. शिक्षक दिन हा केवळ एक दिवस नसून शिक्षकांप्रती असलेली आपली बांधिलकी आणि आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात सांस्कृतिक उपक्रमांचेही मोठे योगदान आहे.”

ज्येष्ठ प्राध्यापक प्रा. नरंगलकर म्हणाले, “बाबुरावजी घोलप यांनी लावलेल्या या शिक्षणाच्या रोपट्याला आज वटवृक्षाचे रूप आले आहे. आम्ही शिक्षक म्हणून या संस्थेत काम करताना स्वतःला धन्य समजतो. शिक्षकाने सतत विद्यार्थी राहिले पाहिजे, तरच तो चांगला शिक्षक होऊ शकतो.”

प्रा. प्रकाश पांगारे यांनी आपले विचार मांडताना सांगितले, “डॉ. राधाकृष्णन म्हणायचे, ‘योग्य शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर चारित्र्य निर्माण करणे होय’. आजच्या विद्यार्थ्यांनी केवळ गुण मिळवण्यापेक्षा चांगला माणूस बनण्यावर भर दिला पाहिजे.”

See also  नवीन इमारतीत मराठी भाषिक व्यक्तींना घरे खरेदी करण्यासंदर्भातील धोरण करणार – मंत्री शंभूराज देसाई

संपूर्णतः विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये पत्रकारिता अभ्यासक्रमाचा विद्यार्थी अभिषेक पाटील याने संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्ष विज्ञान शाखेची विद्यार्थिनी श्वेता हुलवळे हिने केले तर आभार तृतीय वर्ष बीसीए शाखेच्या अबोली कोडग हिने व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. गणेश चौधरी, प्रा. संतोष रोडे, प्रा. संतोष वाढवनकर, प्रा. किसन पालखे, प्रा. हरिश्चंद्र टिंबोळे, प्रा. सम्यक खरात, प्रा. प्रकाश भिसे यांनी विशेष सहकार्य केले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.