वाहतुकीला अडथळा ठरलेले औंध मधील हेरिटेज स्ट्रक्चर हलविणार -आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे: वाहतूक सुरळीत करण्यासाठी औंध बॉडी गेट चौकी येथील रस्त्याच्या मधोमध असलेले हेरिटेज स्ट्रक्चर येत्या १५ दिवसांत हलविले जाईल, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज बुधवारी दिली.

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी येथे प्रत्यक्ष भेट देऊन वाहतुकीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका भक्ती गायकवाड, नगरसेविका सपना छाजेड, आनंद छाजेड, अभिजित गायकवाड, नाना वाळके, राहुल गायकवाड भवन, मालमत्ता, रस्ते विभागाचे अधिकारी तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध असलेले हेरिटेज स्ट्रक्चर अनेक वर्षांपासून वाहतुकीस अडथळा ठरत होते. विशेषतः औंधकडून ब्रेमन चौकमार्गे राजीव गांधी पुलाकडे जाणाऱ्या वाहनांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होता, कारण संबंधित स्ट्रक्चर हलविणे शक्य नव्हते. पोलीस व महानगरपालिका यांच्या समन्वयातून आवश्यक सर्व परवानग्या मिळवून हा अडथळा दूर करण्यात यश आले आहे. येत्या १५ दिवसांत हे स्ट्रक्चर हटविण्याचे काम पूर्ण होईल आणि पुढील महिन्याभरात रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येईल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.

या कामामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

See also  भाजपच्या प्रभाग क्रमांक ११ मधील पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद