शिक्षणात आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी शिष्यवृत्ती महत्त्वाची भूमिका बजावते : आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे

पुणे : लीलापूनावाला फाउंडेशन (LPF) यांच्या वतीने पुण्यातील नूराह-अल-बासम हॉल येथे पदव्युत्तर आणि बॅचलर ऑफ सायन्स शिष्यवृत्ती पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. उच्च शिक्षण घेत असलेल्या युवा महिलांच्या आकांक्षा, यश आणि भविष्यातील संधींचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आयकर आयुक्त (सूट), पुणे, डॉ. नितीन वाघमोडे तसेच विशेष अतिथी म्हणून २००८ बॅचच्या एलआयएलए फेलो आणि पुणे येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील अधीक्षक सुजाता आगराव दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

१९९५ मध्ये स्थापन झालेल्या लीलापूनावाला फाउंडेशनने आतापर्यंत सुमारे १९ हजार मुली आणि युवा महिलांना शिष्यवृत्ती, कौशल्य विकास, करिअरची तयारी आणि सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून सहकार्य केले आहे. २०२६ अखेरपर्यंत ही संख्या २० हजारांचा टप्पा ओलांडेल, अशी अपेक्षा आहे. फाउंडेशनचा दृष्टिकोन केवळ आर्थिक मदत करण्यापुरता मर्यादित नसून, लाभार्थींना अर्थपूर्ण करिअरसाठी तयार करणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक स्वावलंबी होण्याच्या दिशेने सक्षम करणे, यावर भर दिला जातो.

या सोहळ्यात पुण्यातील विविध महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या १०० हून अधिक युवा महिलांना, तसेच बॅचलर ऑफ सायन्स अभ्यासक्रमातील सुमारे ५० विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थिनींना आपले शिक्षण सुरू ठेवण्याबरोबरच आपली कौशल्ये अधिक विकसित करण्याची आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी भविष्यातील वाटचाल करण्याची संधी मिळते.

एलपीएफच्या या दृष्टिकोनाचा प्रभाव फाउंडेशनच्या हजारो लाभार्थींच्या करिअरच्या वाटचालीतही दिसून येतो. एलआयएलए गर्ल्सना जगातील नामांकित संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. काहींनी शिक्षण क्षेत्राला करिअर म्हणून निवडले आहे, तर काहींनी उच्च शिक्षणाच्या दिशेने वाटचाल केली आहे. कोअर इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग आणि आरोग्य विज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपले करिअर घडविले आहे. एलपीएफचा सरासरी रोजगार मिळण्याचा दर सुमारे ७० ते ७५ टक्के आहे.

नवीन एलपीएफ शिष्यवृत्तीधारकांना संबोधित करताना डॉ. नितीन वाघमोडे म्हणाले, “अनेकदा आर्थिक अडचणींमुळे पालकांना आपल्या मुलींच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत शिष्यवृत्ती महत्त्वाची भूमिका बजावते. एलपीएफने भविष्यात आणखी मोठ्या संख्येने मुलींना सहकार्य करावे, अशी माझी इच्छा आहे.”

See also  योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने कन्यादान उपक्रम; ९ वी मासिक सभा उत्साहात संपन्न

नवीन शिष्यवृत्तीधारकांनी या संधीचा पुरेपूर लाभ घेत आपल्या स्वप्नांची पूर्तता करावी आणि भविष्यात समाजाला काहीतरी परत देण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

लीला पूनावाला, संस्थापक आणि अध्यक्षा, एलपीएफ म्हणाल्या, “आर्थिक परिस्थिती किंवा कौशल्याच्या अभावामुळे कोणत्याही पात्र मुलीच्या स्वप्नांना मर्यादा येऊ नयेत, हा आमचा कायम प्रयत्न राहिला आहे. व्यावहारिक आणि अनुभवाधारित कौशल्य विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या मुलींना उद्योग आणि कार्यक्षेत्राच्या अपेक्षांनुसार तयार करणे आवश्यक आहे, असे आमचे मत आहे. भक्कम निधीची उभारणी केल्यास हा दृष्टिकोन पुढे नेण्यास मदत होईल. त्यामुळे आगामी काळातही मुलींना शिकण्यासाठी, प्रगती करण्यासाठी आणि आत्मनिर्भर भविष्य घडविण्यासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देता येतील.”

फाउंडेशनने संस्थापक विश्वस्त, विश्वस्त मंडळ, कॉर्पोरेट भागीदार, वैयक्तिक देणगीदार, कुटुंबीय, मित्र आणि हितचिंतक यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या सातत्यपूर्ण विश्वास आणि सहकार्यामुळेच अशा शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे शक्य होत असल्याचे फाउंडेशनने नमूद केले.