बालेवाडी : बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनची ५वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेत फेडरेशनच्या मागील वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला तसेच आगामी काळातील विविध उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.
फेडरेशनचे सचिव आशिष कोटमकर यांनी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त सादर केले. अध्यक्ष रमेश रोकडे यांनी पाचवा वार्षिक अहवाल सादर करून २०२५-२६ या वर्षात फेडरेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध कामांची माहिती सभासदांना दिली. खजिनदार दफेदार सिंह यांनी आर्थिक विवरणपत्र तसेच आगामी वर्षाचे अंदाजपत्रक सभेसमोर मांडले. या दोन्ही बाबींना उपस्थित सभासदांनी मान्यता दिली.
दरम्यान, बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनला नुकतेच आयकर विभागाकडून ८० जी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी फेडरेशनचे सदस्य संदिप मंडोलिया यांनी विनामोबदला सहाय्य केले. त्यांच्या या योगदानाबद्दल सभेत त्यांचा सत्कार करण्यात आला.
पर्यावरण संवर्धन आणि नदी वाचविण्यासाठी कार्य करणाऱ्या वंदना चौधरी, ग्राहक मार्गदर्शन केंद्राचे संचालन करणाऱ्या ॲड. रुपाली रायकर, पाणी बचत अभियान राबविणाऱ्या शुभांगी चपाटे, पाणी प्रश्नाचा सखोल अभ्यास करणारे यश चौधरी तसेच फेडरेशनचा आयटी सेल सांभाळणारे योगेश डुंबरे यांच्या कार्याचे उपाध्यक्ष मोरेश्वर बालवडकर यांनी कौतुक केले.
यावेळी फेडरेशनच्या वतीने १० हजार नागरिकांच्या सह्यांचे पत्र पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, स्थानिक आमदार कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पाठविण्यात आल्या. यावेळी नागरिकांच्या सह्यांचे मोठे गठ्ठे उपस्थितांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. फेडरेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध सामाजिक व नागरी उपक्रमांमध्ये अधिकाधिक सभासदांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन उपाध्यक्ष मोरेश्वर बालवडकर यांनी केले. शेवटी त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.















