पुणे : बावधन खुर्द परिसरातील सर्व्हे क्रमांक २२१ ते २२५ येथे अनधिकृतपणे सुरू असलेल्या पाच रेडी-मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांटवर पुणे महानगरपालिका आणि संबंधित प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. या कारवाईत पाचही प्लांट बंद करण्यात आले असून, अनधिकृत बांधकामे पाडून सुमारे ३५ हजार चौरस फूट क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे पाचही आरएमसी प्लांट भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील ‘एचईआरएमएल’ (HEMRL) संस्थेच्या ४५० मीटर परिसरातील प्रतिबंधित व संरक्षित क्षेत्रात येत होते. तसेच, या प्लांटसाठी पुणे महानगरपालिकेची आवश्यक कायदेशीर परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रशासनाने या अनधिकृत व्यवसायांवर कारवाई केली.
महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग (झोन ३), अतिक्रमण विभाग, आकाशचिन्ह विभाग आणि महावितरण यांच्या संयुक्त सहभागातून ही कारवाई करण्यात आली. यावेळी अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली, प्लांटचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आणि प्लांट सील करण्यात आले.
शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर आणि महापालिका सहाय्यक आयुक्त सुहास जाधव उपस्थित होते. बांधकाम विभागाचे उपअभियंता भास्कर हांडे आणि शाखा अभियंता अजय फाले यांच्या नेतृत्वाखाली कारवाई पूर्ण करण्यात आली.
प्रदूषणाच्या समस्येतून सुटकेची आशा
बावधन खुर्द परिसरातील नागरिकांनी आरएमसी प्लांटमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर झालेल्या या कारवाईमुळे परिसरातील प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संवेदनशील संरक्षण क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर झालेल्या या कारवाईमुळे परिसरातील अन्य अनधिकृत व्यावसायिकांनाही स्पष्ट संदेश मिळाला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकामांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
















